ऑक्टोबर क्रांतीचा वारसा आणि एकविसाव्या शतकातील नव्या समाजवादी क्रांत्यांचे आव्हान
मागच्या अंकातील संपादकीय लेखाचा उर्वरीत भाग
ऑक्टोबर क्रांतीच्या महान वारसाकडे आज आपण कसं पाहिलं पाहिजे ? आपल्या देशातील काही कम्युनिस्ट क्रांतिकारक डोळे बंद करून चीनच्या क्रांतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, तसे अंधानुकरण आपण ऑक्टोबर क्रांतीचेही करणार आहोत काय ? क्रांतीची पुनरावृत्ती होत नाही, आणि तिची कार्बन काॅपीसुद्धा काढता येत नाही. कामगार वर्गाची प्रत्येक नवीन पिढी आपल्या पूर्वजांनी केलेल्या प्रयोगांचे नीरक्षीर विवेकाने (नीरक्षीर=पाण्याला पाणी व दुधाला दुध) परीक्षण करते आणि त्यांच्याशी एक चिकित्सक संबंध जोडते. ती त्यांच्यापासून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही धडे घेत, नव्या, बदललेल्या परिस्थितीनुसार नव्या क्रांतीची रणनीती आणि रणकौशल्य आखते. तर,मग आज आपण ऑक्टोबर क्रांतीपासून काय धडा घेऊ शकतो? त्यासाठी लेनिन आणि स्तालिन यांनी ऑक्टोबर क्रांतीच्या वैिशष्टया बद्दल काय म्हटले आहे यावर थोडक्यात चर्चा करू.
ज्या विशिष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये ऑक्टोबर १९१७ ला रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली, त्याचा उल्लेख लेनिन यांनी केला होता. लेनिन यांच्या म्हणण्यानुसार दोन कारणे त्यावेळी ऑक्टोबर क्रांतीसाठी प्रामुख्याने जबाबदार होती. एक म्हणजे पहिल्या महायुद्धामुळे रशियात निर्माण झालेले आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संकट. दुसरं म्हणजे, देशामध्ये उत्स्फूर्तपणे ‘कामगार सोविएतांचा’ उदय आणि त्याचबरोबर ‘भूमी समित्यांनी’ भूमीवर आणि ‘कारखाना समित्यांनी’ कारखान्यांवर कब्जा करण्याची सुरू केलेली मोहीम. अशा परिस्थितीमध्ये बोल्शेविक पार्टीला अशा एका देशामध्ये कामगार वर्गाच्या नेतृत्त्वाखाली सत्ता हस्तगत करावी लागली जिथे कामगारांची संख्या फक्त १० ते ११ टक्के इतकी होती, व लोकसंख्येच्या ८५ टक्के हिस्सा शेतकरी होता, अजून भूमीसुधारणा आणि इतर लोकशाही कार्येसुद्धा पूर्ण झाली नव्हती. जर बोल्शेविक पार्टीने असे केले नसते तर त्यावेळी लोकशाही क्रांतीचा खून झाला असता आणि त्याचबरोबर समाजवादी क्रांतीची शक्यता दीर्घ काळासाठी संपुष्टात आली असती. या दोन गोष्टी ऑक्टोबर क्रांतीला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. हे वैशिष्ट्य समजून घेणे फार गरजेचे आहे.
स्तालिन यांनी १९२४ मध्ये ऑक्टोबर क्रांती आणि रशियाच्या कम्युनिस्टांची कार्यनीती नामक आपल्या लेखामध्ये रशियन क्रांतीच्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीचे विस्तारपूर्वक विवेचन केले आहे. रशियन क्रांतीच्या अंधानुकरणाद्वारे एकविसाव्या शतकातील नव्या समाजवादी क्रांतीची रणनीती आणि सामान्य रणकौशल्य आखले जाऊ नयेत म्हणून, आज कामगार क्रांतिकारकांनी ते समजून घेतले पाहिजे. स्तालिन एक प्रकारे येत्या पिढ्यांतील कम्युनिस्ट क्रांतिकारकांना अशा एका धोक्याबद्दल अप्रत्यक्षपणे इशारा देत आहेत असे वाटते. स्तालिन म्हणतात, ज्या तीन बाह्य कारणांनी रशियाच्या क्रांतीची मदत केली ती म्हणजे १. साम्राज्यवादी युद्ध (पहिले महायुद्ध) ज्याने दोन प्रमुख साम्राज्यवादी गटांना (ब्रिटन-फ्रान्स आणि जर्मनी-आॅस्ट्रिया) रशियातील सर्वहारा वर्गाच्या क्रांतिकारी आंदोलनाकडे लक्ष देण्याची संधीच दिली नाही २. साम्राज्यवादी युद्धाने रशियातील कष्टकरी जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला होता आणि लोकांनाही युद्धाचा उबग आला होता समाजवादी क्रांतीच युद्धापासून सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग आहे हे त्यांना कळून चुकले होते. ३. युरोपमध्ये एक बळकट कामगार आंदोलन सुरू होते आणि जर्मनीसह कित्येक देशांमध्ये क्रांतिकारक परिस्थिती निर्माण होत होती. (परंतु ितथल्या नेतृत्व देणाऱ्या पक्षसंघटनाच्या चुकांमुळे रशियासारखी क्रांती तेथे पूर्ण होऊ शकली नाही) म्हणूनच रशियन क्रांतीला कित्येक देशांमध्ये आपले शक्तीशाली मित्र मिळाले होते. या तीन बाह्य कारणांच्या जोडीला सहा आंतरिक कारणंही होती,ज्यांनी बोल्शेविक क्रांती शक्य करून दाखवली. १. बोल्शेविकांना कामगार वर्गाचे व्यापक समर्थन मिळालेले होते. भूमी आणि शांततेच्या प्रश्नाबाबत क्रांतिकारी भूमिकेमुळे पार्टीला शेतकरी आणि सैनिकांचेही समर्थन मिळाले. ऑक्टोबर क्रांतीमध्ये कामगार वर्गाला नेतृत्त्व देण्यासाठी एक तावूनसुलाखून निघालेली, अनुभवसंपन्न, अनुशासित आणि परिपक्व कम्युनिस्ट पार्टी अस्तित्त्वात होती. ऑक्टोबर क्रांतीच्या समोर एक कमकुवत झालेला शत्रू होता – रशियाचा भांडवलदार वर्ग आताच सत्तेत आला होता आणि अजून भांडवली राज्यसत्ता स्वतःला बळकट करू शकलेली नव्हती.ती काही औद्योगिक केंद्रे आणि शहरांमध्येच प्रभावी होती. शेतकरी उठावांमुळे भांडवली भूस्वामींच्या सत्तेला तडा गेलेला होता आणि जे भांडवली आणि निम्नभांडवली पक्ष अस्थायी सरकारमध्ये होते ते भूमी आणि शांततेच्या प्रश्नावर तडजोड आणि गद्दारी करीत होते. रशियाचे साम्राज्य विशालकाय होते आणि त्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत एका युवा भांडवली राज्यसत्तेची पोहोच नव्हती. त्यामुळे क्रांतिकारकांना मुक्तपणे रणकौशल्य आखणे, आवश्यकतेनुसार मागे हटणे आणि विश्राम करून पुन्हा आक्रमणाच्या तयारीची जास्त संधी होती. प्रतिक्रांतिकारकांच्या विरोधात आणि साम्राज्यवाद्यांच्या वेढ्याला यशस्वीपणे तोंड देण्यास परिस्थिती अनुकूल नसूनसुद्धा सोविएत रशियाकडे कामचलाऊ खाद्यान्न पुरवठा व इतर संसाधने उपलब्ध होते.
पुढे स्तालिन यांनी दोन प्रतिकूल बाबींचा उल्लेख केला आहे. १. ऑक्टोबर क्रांतीने सोविएत रशियाच्या रूपात जगातील पहिली समाजवादी सत्ता स्थापन केली आणि त्यावेळी जगात दुसरे कोणतेच समाजवादी राज्य अस्तित्त्वात नव्हते ज्यावर बोल्शेविक समाजवाद निर्माणासाठी अवलंबून राहू शकत होते. त्यामुळे सोविएत सत्ता काहीशी बाजूला पडली. रशियाच्या लोकसंख्येमध्ये सर्वहारा वर्ग एक लहान अल्पसंख्येच्या रूपात होता आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये रशियात समाजवादी क्रांतीची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तिला रॅडिकल भूमी सुधारणा कराव्या लागल्या आणि शेतीमध्ये समाजवादी उत्पादन संबंध स्थापन करण्यास बरीच वाट बघावी लागली. त्यानंतरदेखील अनेकानेक अडचणी आणि गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देतच शेतीमध्ये समाजवादी संबंध पस्थापित होऊ शकले. भांडवली लोकशाही क्रांतीचे अनेक कार्यभार पूर्ण करावे लागल्याने समाजवादी क्रांती आणि निर्माण पुढे न्हेताना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. यामुळेच रशियाच्या क्रांतीची स्तालिन यांच्या मते दोन मुख्य गुणवैशिष्ट्ये अशी होती. १. ही क्रांती बळकट कामगार शेतकरी युतीच्या आधारेच संपन्न होऊ शकत होती व त्यात व्यापक शेतकरी वर्गाचे नेतृत्त्व अल्पसंख्य सर्वहारा वर्ग करीत होता २. ही क्रांती एका देशात समाजवादाचे निर्माण आणि सर्वहारा अधिनायकत्वावर आधारलेली होती. हा देश शेतकरी बहुसंख्या असणारा आणि मागास देश होता, जेथे भांडवली लोकशाही क्रांतीची अनेक कार्यभार अपूर्ण राहिले होते. युरोपच्या इतर देशांमध्ये, प्रामुख्याने जर्मनीमध्ये, क्रांत्या अयशस्वी झाल्यामुळे रशियाच्या क्रांतीचा आणि समाजवादी निर्माणाचा मार्ग अतिशय बिकट आणि कठीण झाला होता.
स्तालिन सांगत असलेली ही वैशिष्ट्ये आणि चरीत्रात्मक लक्षणांमुळेच लेनिन यांनी म्हटले होते की समाजवादी क्रांती संपन्न करणे सोपे आहे, परंतु ती टिकवून ठेवणे जास्त कठीण आणि गुंतागुंतीचे आहे. उलट तुलनेने अधिक उन्नत आणि औद्योगिकीकरण झालेल्या देशांमध्ये, जेथे सर्वहारा वर्ग मोठा आहे, उदाहरणादाखल जर्मनी किंवा फ्रान्स, तेथे क्रांती करणे जास्त कठीण होईल परंतु एकदा समाजवादी क्रांती झाली तर या देशांमध्ये समाजवादी निर्माणाचा मार्ग तुलनेने जास्त सुलभ असेल. याचे कारण म्हणजे या देशांमध्ये सर्वहारा वर्ग लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा बनला होता, शेतीचे भांडवली रूपांतर प्रामुख्याने क्रांतिकारी किंवा बिगर क्रांतिकारी मार्गांनी पूर्ण झालेले होते, देशातील उत्पादक शक्तींच्या विकासाचा स्तर अधिक उंचावलेला होता आणि इतर लोकशाही कार्यभारसुद्धा मुख्यतः पूर्ण झालेले होते, देशातील सर्वहारा वर्गापाशी संघटना आणि संघर्षाचा तुलनेने जास्त अनुभव होता आणि त्यांच्या राजकीय जाणीवा तुलनेने अधिक परिपक्व होत्या. या प्रगत भांडवली देशांमध्ये भांडवली राज्यसत्तेचा सामाजिक आधार तुलनेने अधिक व्यापक होता, तेथे भांडवलदार वर्गाकडे राज्य करण्याचा जास्त अनुभव होता आणि त्याच्या राज्यसत्तेची पोहोच समाजात खोलवर रुजलेली होती. म्हणूनच या अधिक कुशल, अधिक अनुभवी आणि अधिक संघटित भांडवलदारवर्गाच्या आणि त्याच्या राज्यसत्तेच्या विरुद्ध क्रांती करणे रशियासारख्या मागास भांडवलदार देशाच्या तुलनेत अधिक कठीण होते.परंतु एकदा क्रांती झाल्यावर उपरोक्त कारणांमुळे ती टिकवणे आणि समाजवादी निर्माणाचे कार्य करणे तुलनेने जास्त सुगम होते. रशियाच्या बाबतीत घडलेली एक शोकांतिका म्हणजे युरोपच्या तुलनेने जास्त प्रगत देशांमध्ये कित्येक ठिकाणी क्रांतिकारक परिस्थिती निर्माण होऊनसुद्धा सर्वहारा वर्ग क्रांती करू शकला नाही. त्यामुळे रशियातील कामगार सत्तेला आणि समाजवादाला कोणीही मजबूत मित्र लाभला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका देशात समाजवाद निर्माण करणे हाच स्तालिन यांच्या नेतृत्त्वात केलेला एक चमत्कार होता. परंतु रशियायन क्रांतीच्या या विशिष्ट प्रतिकूल आणि अनुकूल अशा ऐतिहासिक परिस्थितींचे कारण त्याचे इतिहासातील विशिष्ट स्थान हेच आहे आणि म्हणूनच तिचे अनुकरण करणे शक्य नाही.
लेनिन यांनी तेव्हाच सांगितले होते की साम्राज्यवाद आणि मक्तेदार भांडवलशाहीच्या काळात सर्वहारा क्रांत्यांच्या वादळाचे केंद्र युरोपच्या प्रगत भांडवली देशांकडून सरकून आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या देशांकडे गेले आहे. हे होत असतानाच पूर्व आणि पश्चिमेच्या सेतूवर, म्हणजेच रशियामध्ये (ज्याला युरेशियासुद्धा म्हटले जायचे) सर्वहारा वर्गाने अंतर्विरोधांची एक गाठ तयार झाल्याच्या स्थितीचा फायदा घेत क्रांती केली आणि पहिल्या समाजवादी सत्तेची स्थापना केली. या प्रयोगाचे ऐतिहासिक महत्त्व, तिचे वैशिष्ट्य आणि त्याचबरोबर तिच्या ऐतिहासिक मर्यांदाबद्दल आपण बोललो आहोत. आजच्या काळात क्रांत्यांच्या वादळाचे केंद्र पूर्णपणे अशा देशांमध्ये सरकले आहे ज्यांना गुलामीचा इतिहास लाभलेला आहे. लेनिन यांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सांगितले होते की या देशांमध्ये (जे त्या काळी गुलाम किंवा अर्धगुलाम होते) दोन टप्प्यांमध्ये क्रांती होईल, अगोदर सर्वहारा वर्ग एकूण शेतकरी वर्गाला सोबत घेऊन साम्राज्यवाद आणि सामंतवाद विरोधी राष्ट्रीय लोकशाही क्रांती करेल आणि नंतर गरीब शेतकरी समुदायाला सोबत घेऊन भांडवलशाही विरोधी समाजवादी क्रांती करेल. १९७० च्या दशकाच्या अखेरपर्यंत आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील बहुतेक देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाले होते. अर्थातच, आर्थिकदृष्ट्या ते साम्राज्यवादावर विसंबून होते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात ही आर्थिक निर्भरता एका नव्या रूपात समोर आली आहे, परंतु राजकीय दृष्ट्या भारत, इजिप्त, टर्की, इडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी देशांमध्ये भांडवलदार शासक वर्गाने आपले राजकीय स्वातंत्र्य टिकवून ठेवले आहे. काही विशिष्ट काळामध्ये या देशांची साम्राज्यवादावरची आर्थिक निर्भरता त्याच्या राजकीय स्वातंत्र्यावर मात करताना दिसते, परंतु प्रामुख्याने ते राजकीयदृष्ट्या स्वतंत्र आहेत. या देशांचा भांडवलदार वर्ग साम्राज्यवादाचा (कुठल्याही एका साम्राज्यवादी देशाचा नाही तर वेगवेगळ्या साम्राज्यवादी गटांशी मोलभाव करताना समस्त साम्राज्यवादाचा) ज्युनियर पार्टनर आहे. तो साम्राज्यवादी देशांवर तंत्रज्ञान आणि भांडवलासाठी विसंबून आहे जेणेकरून आपल्या देशातील कामगार वर्गाचे अधिक कौशल्याने शोषण करता येईल व त्याच्या बदल्यात तो साम्राज्यवादी देशांसाठी आपल्या देशातील बाजाराचे दरवाजे उघडे करतो. साम्राज्यवादी देशसुद्धा बाजार आणि थेट गुंतवणुकीच्या संधीसाठी या देशांवर अवलंबून आहेत कारण त्या देशांमधे एक विशाल उपभोक्ता मध्यमवर्ग आहे.
या सर्व तुलनेने मागास असलेल्या भांडवली देशांमध्ये सामंती उत्पादन संबंधांचे फार फार तर काही अवशेष शिल्लक आहेत. क्रांतिकारी पद्धतीने (राष्ट्रीय लोकशाही क्रांती आणि रॅडिकल भूमी सुधारणा) किंवा गैर क्रांतिकारी मार्गाने (सामंती भूस्वामींनाच भांडवली कुलक किंवा फार्मर होण्याची संधी देणाऱा प्रशियन प्रकारच्या भूमीसुधारणा) या देशांतील सामंती उत्पादन संबंध मुख्यतः समाप्त केले आहेत. ज्या देशांमध्ये ही प्रक्रिया गैर क्रांतिकारी मार्गाने झालेली आहे तेथे सामंती अवशेष दीर्घ काळपर्यंत अस्तित्त्वात राहिले आणि जेव्हा ते संपुष्टात आले तेव्हादेखील शेतीमध्ये मागासलेपण टिकून राहिले. यामुळेच कित्येक कम्युनिस्ट क्रांतिकाऱ्यांमध्ये सामंती उत्पादन संबंध असल्याचा भ्रम निर्माण होतो. परंतु आज फक्त एखादा आंधळा आणि चपलाच्या मापानं पाय कापणारा, पोथिनिष्ठ कम्युनिस्टच भारतात शेतीमध्ये सामंती उत्पादन संबंध आहेत असे म्हणू शकतो. या सर्व पूर्वीच्या गुलाम देशांमध्ये एका विशिष्ट प्रकारची, तुलनेने मागासलेली, भांडवलशाही विकसित झाली आहे. या देशांमध्ये उद्योगांचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे, तसेच ‘संरचनात्मक साचा’ सुद्धा बऱ्यापैकी विकसित झालेला आहे, कामगारांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ४० ते ५० टक्के इतकी झालेली आहे, शहरीकरणाचा वेग चांगला आहे आणि २०२० पर्यंत यांपैकी बहुतेक देशांच्या लोकसंख्येचा मोठा भाग शहरी होणार आहे. याचा अर्थ अशा देशांमध्ये मुख्य अंतर्विरोध, शेतीपासून उद्योगांपर्यंत, श्रम आणि भांडवला मध्येच आहे,अशा देशांमध्ये भांडवलशाहीविरोधी समाजवादी क्रांतीचा टप्पा आलेला आहे.
परंतु हेसुद्धा खरे आहे की या देशांची स्थिती रशियाहून खूप वेगळी आहे. रशिया स्वतः एक दुसऱ्या रांगेतला साम्राज्यवादी देश होता, आणि ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेच्या मागे असूनदेखील पूर्वी युरोप आणि बाल्कन देशांसाठी तो एक साम्राज्यवादी देश होता. पण भारत, इजिप्त, इंडोनेशिया, टर्की, ब्राजीलसारख्या देशांना आता साम्राज्यवादी म्हणता येणार नाही. निश्चितपणे या उगवत्या अर्थव्यवस्थांच्याही साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आहेत आणि काही शेजारील देशांसाठी त्यांची स्थिती एका उदयोन्मुख साम्राज्यवादी शक्तीसारखी झाली आहे. परंतु तरीही जागतिक पातळीवर त्यांना अजून साम्राज्यवादी देश म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या देशांवर अजूनही अमेरिका, जपान आणि युरोपीय संघातील साम्राज्यवादाच्या लुटीचा दबाव आहे. म्हणूनच त्यांची अवस्था गुंतागुंतीची आहे. मुख्य म्हणजे या देशांतील जनता आजसुद्धा म्हणजे स्वातंत्र्यानंतरदेखील साम्राज्यवादी आर्थिक शोषण आणि उत्पीडनाची बळी ठरते आहे आणि आता हे साम्राज्यवादी शोषण देशी भांडवलदारांशी हातमिळवणी करून चालू आहे. म्हणूनच साम्राज्यवादाशी या देशांच्या जनतेचा अंतर्विरोध ही फार दूरच्या इतिहासातील बाब नाही, तर आजसुद्धा तात्कालिक महत्त्वाची अशी ही बाब आहे. या देशांमध्ये ज्या समाजवादी क्रांत्या अपेक्षित आहेत, त्या फक्त भांडवलशाही विरोधी नसतील तर भांडवलशाही विरोधी, साम्राज्यवाद विरोधी क्रांत्या असतील. या अर्थाने त्या गुणात्मकदृष्ट्या एका नव्या प्रकारच्या समाजवादी क्रांत्या असतील आणि या नव्या वैशिष्ट्यामुळे क्रांतीच्या रणनीतीत आणि सामान्य रणकौशल्यात महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.
आणखी एक मोठे परिवर्तन आज आपल्यासमोर आहे. लेनिन आणि स्तालिन यांच्या लिखानात आपण पाहिल्याप्रमाणे रशियामध्ये भांडवली राज्यसत्ता अजून अतिशय कमकुवत होती, भांडवलदार वर्गाचे शासन अजून बळकट झालेले नव्हते आणि युद्धाने त्याला आणखीनच कमकुवत आणि पोकळ करून टाकले होते. त्याच वेळी सर्वहारा वर्गाने आपल्या अग्रदूत पार्टीच्या नेतृत्त्वाखाली त्या राज्यसत्तेवर प्रहार केला आणि भांडवली राज्यसत्ता ध्वस्त करून आपली राज्यसत्ता स्थापन केली. ही राज्यसत्ता काही शहरांमध्येच मर्यादित होती आणि रशियासारख्या विशालकाय देशाच्या दूरवरच्या भागांमध्ये तिची पकड मजबूत झालेली नव्हती. समस्त रशियन समुदायामध्ये या राज्यसत्तेचा सामाजिक आधार अगदीच मर्यादित होता. लोकसंख्येतील पाच-सहा टक्क्यांहून जास्त माणसे या नवजात भांडवली सत्तेची समर्थक नव्हती. आज स्थिती तशी नाही. उदाहरणादाखल आज आपल्या देशात भांडवली राज्यसत्तेच्या सामाजिक अवलंबाची भूमिका पार पाडणाऱ्या वर्गांचीच एकूण लोकसंख्या १५ ते २० टक्के इतकी आहे. मोठा भांडवलदार वर्ग, छोटा भांडवलदार वर्ग, नोकरशहा वर्ग, शेअर बाजारांच्या दलालांपासून प्रापर्टी डिलरसारख्या मध्यस्थांचा वर्ग, छोट्या-मोठ्या व्यापाऱ्याचा निमभांडवलदार वर्ग आणि त्याचबरोबर सुखवस्तू शेतकरी आणि श्रीमंत शेतकऱ्यांच्या एकूण वर्गाची लोकसंख्या एकत्र केली तर ती एकूण लोकसंख्येच्या १५ ते २० टक्के इतकी होते. म्हणूनच आजच्या भांडवली राज्यसत्तेची सामाजिक मुळं अधिक खोलवर रुजलेली आहेत. तिची राजकीय आणि प्रशासकीय मुळं सुद्धा अधिक खोल गेलेली आहेत. आजची भांडवली राज्यसत्ता काही प्रमुख शहरे आणि औद्योगिक केंद्रे यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर गाव पंचायतीच्या प्रधानापासून लेखपाल, तलाठी, ब्लाक डेवलपमेंट आफिसर, नगरसेवक, आमदारापासून संसदेपर्यंत तिच्या नसा आणि शीरा गाव, गल्ली आणि वस्त्यांपर्यंत पसरलेल्या आहेत. तिच्या सैन्यशक्तीची पोहोच काही मिनिटांत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचण्याइतकी व्यापक आहे. थो़डक्यात, ही राज्यसत्ता म्हणजे समाज आणि राजकीय ताणतणावापासून वेगळी असलेली, वरून लादलेली अशी गोष्ट नाही तर देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय ताणतणावात एकरूप झालेली अशी व्यवस्था आहे. म्हणूनच रशियामध्ये जितक्या सहजपणे समाजवादी क्रांती झाली तेवढ्या सहजपणे येथे क्रांती होऊ शकत नाही आणि इथल्या क्रांतीला अगदी वेगळ्या मार्गाने जावे लागेल. परंतु त्यामुळे निराश व्हायचे कारण नाही. कारण रशियाच्या क्रांतीच्या तुलनेत एक मोठी सकारात्मक बाब आज समाजवादी क्रांतीच्या बाजूने उभी आहे. रशियामध्ये समाजवादी क्रांतीच्या वेळी कामगार वर्ग एकूण लोकसंख्येच्या फक्त १० ते १२ टक्के होता. म्हणजेच क्रांतीचे खुलेपणाने आणि निःसंशयपणे समर्थन करणारा भाग फक्त १० ते १२ टक्के होता. शेतकऱ्यांच्या व्यापक लोकसंख्येला आपल्यासोबत घेण्यासाठी बोल्शेविक पार्टीला रॅडिकल भांडवली भूमिसुधारणांचा कार्यक्रम राबवावा लागला. हा इच्छेचा प्रश्न नव्हता. त्या वेळी इतिहासाने लादलेली ती अनिवार्यता होती. शेतकऱ्यांची विशाल जनसंख्या त्याशिवाय क्रांतीच्या बाजूने उभी राहिली नसती. रॅडिकल भांडवली भूमीसुधारणांनी दूरगामी स्तरावर समाजवादी निर्माणाच्या पुढ्यात एक आव्हान आणि गुंतागुंत निर्माण केली. कारण क्रांतीनंतर समाजवादी कामगारसत्तेला शेतीमध्ये समाजवादी सामूहिक शेतीचे उत्पादन संबंध स्थापित करण्यास अतिशय कठिण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. आजच्या नव्या समाजवादी क्रांतीसमोर हे आव्हान नाही. देशामध्ये मालक शेतकऱ्यांची एकूण संख्या लोकसंख्येच्या फक्त २७ टक्के इतकीच आहे. या २७ टक्क्यांपैकी दोन तृतियांश भाग अर्धसर्वहाराच्या अवस्थेला पोहोचलेला आहे कारण त्यांच्यापाशी इतकी कमी वा नापीक जमीन आहे की त्यांच्या कुटुंबियांना दुसऱ्यांच्या शेतावर किंवा औद्योगिक केंद्रावर जाऊन मजुरी करावी लागते. वास्तविक त्यांच्या कुटुंबाची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर चालत नाही तर पगारी श्रमावर म्हणजेच मजुरीवर चालते. ते मुख्यतः कामगार बनले आहेत आणि लहानशा जमिनीची मालकी फक्त औपचारिकदृष्ट्या त्यांना गरीब शेतकरी म्हणून टिकवून आहे. अर्थातच यामुळे त्यांची सर्वहारा जाणीव धूसर होते. तरीही एक गोष्ट निश्चित आहे की त्यांचे श्रीमंत शेतकरी, कुलक आणि सुखवस्तू मध्यम शेतकऱ्यांशी वर्ग अंतर्विरोध स्पष्ट आहेत आणि ते अधिक टोकदार होत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात कामगार वर्गाशी त्याची जवळीक वाढत जाते आहे. कामगारांची लोकसंख्या पाहिली तर ती ५५ कोटीच्या जवळपास आहे. यांपैकी सुमारे ३३ कोटी ग्रामीण कामगार आहेत तर सुमारे २० ते २२ कोटी शहरी आणि औद्योगिक कामगार आहेत. शुद्ध रूपात सर्वहारा असा हा समुदाय आहे.जर आपण या ग्रामीण आणि शहरी सर्वहारा वर्गाला गरीब शेतकरी, ग्रामीण आणि शहरी अर्धसर्वहारा आणि निम्न मध्यमवर्गाची लोकसंख्या जोडली तर ती ८० कोटीच्या वर जाते. थोडक्यात, आज भारत आणि भारतासारख्या इतर देशांची अवस्था १९१७ च्या रशियाहून खूप वेगळी आहे. जर राज्यसत्तेच्या सामाजिक अवलंबांचा विस्तार झालेला असेल तर त्याहून जास्त वेगाने समाजवादी क्रांतीच्या मित्र वर्गांचा विस्तार झालेला आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे आपण असे म्हणू शकतो की आजच्या नव्या समाजवादी क्रांत्या अधिक कठीण मार्गावरून जातील परंतु यशस्वी झाल्यानंतर त्या टिकण्याची व तुलनेने अधिक सुगम समाजवाद निर्माणाची शक्यता जास्त आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही क्रांतीचा शिल्लक कार्यभारसुद्धा १९१७ च्या रशियाच्या तुलनेत फारच कमी आहेत. आजच्या समाजवादी क्रांतीसमोर व्यापक शेतकरी जनतेला सोबत घेण्यासाठी रॅडिकल भूमीसुधारणांचा कार्यक्रम राबवण्याची सक्ती नाही. उलट कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि त्यांच्यामध्येसुद्धा परिघावरच्या शेतकऱ्यांचा आणि अर्धसर्वहारा समुदायाचा वाटा दोन तृतियांशपेक्षाही जास्त आहे. म्हणूनच ग्रामीण व शेतकरी समुदायाच्या मोठ्या हिश्श्याला सामूहिक शेतीसाठी सहमत करणे अधिक सोपे आहे. अर्थातच एखाधी कम्युनिस्ट शक्ती आजसुद्धा त्यांच्यामध्ये जमिनीची भूक निर्माण करण्यासाठी हट्टाला पेटली तर ही भूक निर्माण केली जाऊ शकते. जमिनीची मालकी हे खाजगी मालमत्तेचे सर्वात आदिम रूप आहे आणि तिच्याबद्दल ओढ निर्माण करणे मागास शेतकरी समुदायामध्ये समाजवादी क्रांतीच्या टप्प्यात शक्य आहे. दूसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर,आज जर देशात आर्थिक पातळीवर शेतकरी जनतेसमोर समाजवादी शेतीचा कार्यक्रम हा योग्य असला तरी त्याचा अर्थ असा नाही की सर्वच शेतकरी जनता उत्स्फूर्तपणे राजकीयदृष्ट्या त्याचसाठी तयार होऊन बसली आहे आणि कम्युनिस्टांची वाट बघते आहे. याचा अर्थ असाही नाही की समाजवादी शेतीचा कार्यक्रम सादर करताच ते त्याचा विरोध करतील. याचा अर्थ असा की आज त्यांना समाजवादी कार्यक्रमासाठी राजी करणे आज जास्त सोपे आहे कारण लहानसा जमिनीचा तुकडा त्यांना काय देऊ शकतो ते त्यांनी पाहिले आहे. सामूहिक शेतीच्या व्यवस्थेद्वारेच त्यांना गरिबी, बेरोजगारी आणि उपासमार यांपासून मुक्ती मिळू शकते, हे ते समजू शकतात. लेनिनला हे चांगलच ठाउक होते. आर्थिक पातळीवर शेतकऱ्यांचे विभेदीकरण आणि सामूहिक शेतीसाठी आर्थिक पातळीवर त्यांच्या तयार होण्याचा अर्थ हा नाही की ते उत्स्फूर्तपणे राजकीय दृष्ट्या समाजवादी सामूहिक शेतीसाठी तयार होऊन बसले आहेत. आर्थिकदृष्ट्या विभेदीकरणानंतरसुद्धा शेतकरी जनतेला कम्युनिस्ट पार्टी सामूहिक समाजवादी शेतीसाठी तयार करते व ते अशा प्रकारेच तयार होऊ शकतात. भारतात आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांच्या मोठ्या हिश्श्याला म्हणजेच गरीब शेतकऱ्यांना त्यासाठी तयार केले जाऊ शकते. या दृष्टीनेसुद्धा, २१ व्या शतकातील नव्या समाजवादी क्रांत्या ज्या देशांमध्ये संभावित आहे, तेथील सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती १९१७ च्या रशियाहून फार वेगळी आहे. यामुळेसुद्धा या समाजवादी क्रांत्यांचे चारित्र्य, स्वरूप आणि मार्ग रशियाच्या समाजवादी क्रांतीहून वेगळे असतील.
आपण येथे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक भांडवलाच्या कार्यप्रणालीमध्ये झालेल्या बदलांवर विस्ताराने चर्चा करू शकत नाही व त्याबद्दल आम्ही पुढे कामगार बिगुलमध्ये लिहू. परंतु सध्या एवढे सांगणे पुरेसे आहे की १९४५ नंतर जागतिक भांडवली व्यवस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. त्यामुळे समाजवादी क्रांत्यांच्या कार्यनीतीमध्येसुद्धा काही बदल होणे स्वाभाविक आहे. या बदलांपैकी प्रमुख बदल पुढीलप्रमाणे होत – उत्तर फोर्डवाद (म्हणजेच एकीकृत कारखाना लहान लहान एककांमध्ये तोडून कामगार जनतेला कार्यस्थळावर विखुरणे, आज हे जागतिक पातळीवर होत आहे), कामगार वर्गाचे अगोदर मोठ्या प्रमाणावर औपचारिकीकरण (१९४५ ते १९७०) आणि त्यानंतर त्याहून मोठ्या प्रमाणात अनौपचारिकीकरण, वित्तीय आणि प्रामुख्याने सट्टेबाज भांडवलाचे अधिपत्य आणि कार्यप्रणाली यांमध्ये लेनिनच्या काळाच्या तुलनेत अभूतपूर्व बदल, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि संपर्काच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भांडवलाच्या वाटचालीमध्ये आणि गतीमध्ये झालेला बदल, आजच्या साम्राज्यवाद आणि भांडवलशाहीकडून मिडिया आणि प्रचारतंत्राचा व्यापकतम, सूक्ष्मतम आणि कुशलतम उपयोग आणि संस्कृतीच्या क्षेत्राचे वर्गसंघर्षाचे पूर्वीच्या तुलनेत जास्त प्रमुख क्षेत्र म्हणून समोर येणे इत्यादी. आता आपण या बदलांवर चर्चा करणार नाही आणि पुढच्या अंकांमध्ये ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दी वर्षात या मुद्द्यांवर विस्तारपूर्वक लिहू. आता एवढेच म्हणता येईल की आजची जागतिक भांडवली व्यवस्था शंभर वर्षे किंवा सत्तर वर्षांपूर्वीच्या जागतिक भांडवली व्यवस्थेहून अगदी वेगळी आहे. हा बदल गुणात्मक नसला तरी महत्त्वपूर्ण मात्रात्मक बदल नक्कीच आहे. त्यामुळे ज्या रणनीतींवर आणि सामान्य रणकौशल्य मार्गाचा वापर विसाव्या शतकातील क्रांत्यांनी केला ते आता कालबाह्य झाले आहेत. उपरोक्त बदलांचा अभ्यास करताना व ते समजून घेताना आज कामगार वर्गाला नवीन रणनीती, रणकौशल्य व मार्ग शोधून काढावे लागतील, एवढेच नव्हे तर क्रांतीच्या आधीसुद्धा आपल्या आर्थिक आणि राजकीय संघर्षांसाठी वेगळे रणकौशल्य आखावे लागतील.
या सर्व बदलांकडे पाहता आम्ही असे मानतो की विसाव्या शतकातील समाजवादी क्रांती, विशेषतः ऑक्टोबर क्रांतीच्या तुलनेत एकविसाव्या शतकातील समाजवादी क्रांत्यांमध्ये परिवर्तनाचा पैलू प्रधान असेल आणि म्हणूनच हा परिवर्तनाचा पैलू रेखांकित करण्यासाठी आणि तो नजरेआड होऊ नये यासाठी आम्ही त्याला नवी समाजवादी क्रांती म्हणतो. या क्रांतीमध्येसुद्धा कोणत्याही समाजवादी क्रांतीप्रमाणेच मूलतः तीन वर्गांची (कामगार वर्ग, गरीब आणि मध्यम शेतकरी वर्ग आणि निम्न मध्यमवर्ग) युती असेल. परंतु तिचे स्वरूप आणि प्रक्रिया ऑक्टोबर क्रांतीहून खूप वेगळी असेल. त्यामागच्या कारणांवर आपण चर्चा केलेलीच आहे.
आज ऑक्टोबर क्रांतीच्या महान वारशाचे स्मरण करण्याची गरज आहे. कारण कामगार वर्गाचा मोठा हिस्सा हा हताश आणि निराश झालेला आहे. त्याच्या पूर्वजांनी कामगारांचे राज्य स्थापन केले होते आणि असे काही असामान्य प्रयोग केले होते ज्यांच्याबद्दल आज वाचतानासुद्धा चकित व्हायला होतं, हे त्याला माहीत नाही. शेवटी त्या प्रयोगांचे अपयश आणि त्यामागची कारणेसुद्धा समजून घेतली पाहिजेत. परंतु या महान क्रांतीपासून प्रेरणा आणि बळ घेताना, तिच्याकडून सकारात्मक आणि नकारात्मक धडा घेताना हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की या क्रांतीचा वारसा जणू आपल्याला सांगतो आहे, माझ्याकडून शिका. माझ्या उपलब्ध्या आणि माझ्या चुका, दोन्हींकडून शिका. परंतु माझी नक्कल करू नका. माझे अंधानुकरण करू नका. आपल्या देशकाळाचे वैशिष्ट्य ओळखा आणि माझ्या नव्या आवृत्तीच्या रचनेची तयारी करा. माझ्या विराट छायेत नव्या लोकक्रांत्यांच्या अंकुरांना आणि पालवीला कोमेजू देऊ नका. माझ्याकडून धडा घ्या आणि हा धडा घेण्यासाठी काळ आणि स्थळ या दोन्ही बाबतीत माझ्यापासून अंतर राखून राहणे गरजेचे आहे. तरच ऑक्टोबरच्या नव्या आवृत्त्या निर्माण होऊ शकतील. आज आपण हाच संदेश समजून घेतला पाहिजे आणि येणाऱ्या नव्या समाजवादी क्रांतीच्या तयारीला लागले पाहिजे. खूप काम करायचे आहे, खूप चालायचे आहे. म्हणूनच क्षणाचा विलंबसुद्धा फार मोठा अपराध ठरेल.
सजेंगे फिर नये लश्कर
मचेगा रणमहाभीषण
उठो संग्रामियो जागो!
नयी शुरुआत करने का समय फिर आ रहा है
कि जीवन को चटख़ गुलनार करने का समय फिर आ रहा है।
कामगार बिगुल, एप्रिल २०१७