तुमच्या जाती-पातीचा ऱ्हास

राहुल सांकृत्यायन  (अनुवाद – प्रविण सोनवणे)

लेखकाचा परिचय

राहुल सांकृत्यायन खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री  गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे  हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.

जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ  शकते की,  ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा,  साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती.  इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र,  मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?,  बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.

राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर  करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”

राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं गतिरोध. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त  भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख  करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.

समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरूद्ध तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.

—————————————-

आपल्या देशाला ज्या गोष्टींवर अभिमान आहे, त्यामध्ये जात-पात सुद्धा एक आहे. दुसऱ्या देशांमध्ये जाती-पातीतील भेद समजला जातो तो भाषेच्या भेदावरून, रंगाच्या भेदावरून. आपल्याकडे एकच भाषा बोलणाऱ्या, एकाच रंगांच्या माणसांच्या वेगवेगळ्या जाती असतात. हा अजब जातीवाद भारताच्या सीमेबाहेर पडल्याबरोबर दिसेनासा होतो आणि या भारतीय जातीवादाचा अर्थ काय?  धर्म आणि आचरणावर संपूर्ण जोर देणारे दुसऱ्या जातीतील लोकांसोबत जेवण जेऊ शकत नाही, त्यांच्या हाताने पाणीसुद्धा पिऊ शकत नाही, लग्न तर खूप लांबची गोष्ट आहे. मुस्लीम आणि ख्रिस्तीसुद्धा या शिवाशिवीच्या रोगापासून वाचू शकलेले नाहीत,  कमीत कमी लग्नसमारंभामध्ये तरी. अस्पृश्यतेचा प्रश्न, जो याच जातीवादाचं सर्वात उग्र रूप आहे,  आपल्या इथे सर्वात भयंकर प्रश्न आहे.  कितीतरी लोक अंगाला स्पर्श झाल्यास आंघोळ करणे गरजेचं समजतात. किती तरी ठिकाणी अस्पृश्यांना रस्त्यावरून जाण्याचा अधिकार नाही. हिंदुंचे धर्मग्रंथ या अन्यायाची अाध्यात्मिक आणि  तात्विक कारणं मांडत असतात. गांधीजी अस्पृश्यता संपवू पाहतात परंतु धर्मशास्त्र आणि वेदांचा हवाला सोबत घेऊन चालू पाहतात.  हे चिखलानेच चिखल धुण्यासारखे आहे.

अस्पृश्यतेला समजून घेणे दुसऱ्या देशातील लोकांसाठी किती अवघड आहे, याचं उदाहरण मी देतो. 1922 मध्ये जेव्हा  ब्रिटीश सरकारने आपला सांप्रदायिक निर्णय दिला आणि गांधीजींनी त्यावर आमरण उपोषण सुरू केले, त्यावेळी मी लंडनमध्ये होतो. खूप दिवसांनंतर ही सनसनाटी बातमी भारताच्या संदर्भात इंग्लंडच्या बातमीपत्रांमध्ये छापून आली. त्यांनी मोठमोठे मथळे देऊन या बातमीला छापले. ज्या देशामध्ये अस्पृश्यता नाही, तेथील लोकांना याबाबतीत काय समजेल? लंडन विद्यापीठामध्ये शिकणारा एक चिनी विद्यार्थी आमच्याकडे आला आणि विचारले-“अस्पृश्यता काय आहे?” मी थोडेसे समजावून सांगायला लागलो. त्याने विचारले-“काय हा एखादा स्पर्शाने पसरणारा आजार असतो की, कोड फुटल्यासारखे काही कारण असते की ज्या कारणाने माणसं व्यक्तीला स्पर्श करू इच्छित नाहीत?”  मी म्हणालो की व्यक्ती आपल्यासारखेच निरोगी असतात, हो बहुतेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची नक्कीच असते. मी अर्ध्या तासांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत अस्पृश्यतेबाबत समजावण्याचा प्रयत्न करत राहिलो, परंतु माझ्या मित्राच्या  काहीच लक्षात येत नव्हते, तेव्हा मी अमेरिकेतील नीग्रो लोकांचे उदाहरण देऊन समजावायला सुरूवात केली. आता कुठे मी थोडे-फार  समजावण्यात यशस्वी झालो, परंतु तरीसुद्धा त्याला समजलेच नाही की एकाच रंगा-रूपाच्या माणसांमध्ये अस्पृश्यता कशी?

गेल्या हजार वर्षांच्या आपल्या इतिहासाला जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की  भारतीय जनता विदेशींकडून पददलित झाली, त्याचे मुख्य कारण जातीभेद होते. जातीभेद माणसांना केवळ तुकड्या-तुकड्या विभाजित करत नाही, तर सोबतच तो त्यांच्या मनामध्ये उच्च-नीचतेची जाणीव निर्माण करतो. ब्राह्मण समजतात, आम्ही उच्च आहोत, राजपूत खालचे आहेत; राजपूत समजतात, आम्ही वरचे आहोत, कहार खालचे; कहार समजतात, आम्ही वरचे आहोत, चांभार खालचे; चांभार समजतात, आम्ही वरचे आहोत, मेहतर खालचे आणि भंगी आपल्या मनाला समजाविण्यासाठी कुणाला तरी खालचे म्हणतातच. हिंदुस्तानामध्ये हजारो जाती आहेत आणि त्या सर्वांमध्ये हीच भावना आहे. राजपूत असल्याने हे समजू नका की ते सर्व एकसमान आहेत, त्यांच्यामध्येही हजारो उप-जाती आहेत. त्यांनी उच्च कुळातील मुलीशी लग्न करून आपल्या जातीचे वरचे स्थान सिद्ध करण्यासाठी आपापसात मोठ-मोठ्या लढाया लढल्या आहेत आणि देशाच्या सैनिकी शक्तीचा खुप मोठा अपव्यय केला आहे. आल्हा-उदलच्या लढाया याबाबतीत प्रसिद्ध आहेत.

या जातीभेदाच्या कारणाने देशाच्या रक्षणाचा भार फक्त एकाच जातीवर सोपविला गेला होता. जिथे देशाच्या मुक्तीसाठी संपूर्ण देशाने आहुती देण्यासाठी तयार असायला पाहिजे, तिथे एकाच जातीच्या खांद्यावर ही जबाबदारी देणे खूपच धोकादायक बाब होती. राजपूत जातीने-जेथपर्यंत सैनिकी उत्साहाचा संबंध आहे-स्वत:ला अयोग्य सिद्ध नाही केले, तरी सुद्धा फक्त देशाच्या रक्षणापर्यंतच गोष्ट राहिली नाही, तिथे तर त्याच्या सोबत-सोबत राज्यशक्तीचे प्रलोभनसुद्धा त्यांच्यात खूप जास्त होते आणि यामुळेच ते आपसांत लढत राहिले. त्यांच्या समोर मुख्य मुद्दा होता काही विशेष राजवंशांचे राखण करण्याचा. राजवंशांचे पारंपरिक वैमनस्य-जे की राज्यशक्ती मिळविण्यासाठीच्या कारणामुळेच होते- त्यांनी राष्ट्रीय सैनिकी ताकदीला अनेक तुकड्यांमध्ये वाटले आणि त्या एकजुट होऊन विदेशी ताकदींशी लढू शकल्या नाही. जर जाती-पाती नसत्या तर इतर देशांसारखे सर्व भारतीय देशाच्या स्वातंत्र्यासाठी विदेशींशी लढले असते. जातीय एकतेच्या कारणामुळे छोटे-छोटे देश खूप काळापर्यंत आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यात यशस्वी झाले. एवढा मोठा भारत देश जेव्हा की 12व्या शतकामध्येच गुलाम झाला, लंकेचा(सिलोन) छोटा टापू, ज्याची लोकसंख्या पन्नास लाखाच्या आसपास आहे, 1814 पर्यंत गुलाम झाला नाही. बर्मा तर त्याच्यापेक्षाही 50-60 वर्षे पूर्वीपर्यंत स्वतंत्र राहिला. भारताच्या शेजारचे इतके छोटे-छोटे देश इतक्या दिवसापर्यंत आपले स्वातंत्र्य का टिकवू ठेवू शकले आणि  आजसुद्धा अफगाणिस्तानसारखे देश स्वतंत्र का आहेत? यामुळेच की तिथे जनता इतक्या तुकड्यांमध्ये विभागलेली नाहीये. तिथे उच्च-नीचतेची भावना इतक्या जास्त प्रमाणात पसरलेली नाही आणि त्यामुळे देशातील सर्वच रहिवासी आपल्या स्वातंत्र्यासाठी क्षत्रिय बनून खांद्याला खांदा लावून लढू शकतात.

भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळेला असा काळ आला, जेव्हा की देशाचे स्वातंत्र्य पुन्हा मिळत होते, परंतु आपल्या जुन्या सवयींनी तसे होऊ दिले नाही. शेरशाह वंशाच्या राजमंत्री बहादुर हेमचंद्राने एक वेळेस असा विचार काय केला, दिल्लीच्या गादीवर  बसलासुद्धा, परंतु राजपुतांनी त्याला  बनिया (व्यापारी) संबोधत त्याचा विरोध केला. दूरदर्शी सम्राट अकबराने संपूर्ण भारताला  एकाच जातीखाली आणण्याचं स्वप्नं पाहिले. परंतु त्याचे हे स्वप्न, स्वप्नच बनून राहिले. आणि त्यानंतरच्या हिंदू- मुसलमानांनी कधी त्या जातीय ऐक्याच्या स्वप्नाला उघड्या डोळ्यांनी पाहणे पसंत केले नाही. इंग्रजांच्या हातात सत्ता जाण्याअगोदर भारतामधील सगळ्यात मोठे साम्राज्य मराठ्यांचे होते, परंतु तेसुद्धा ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्षामुळे छिन्नविछिन्न झाले. आपल्या पराभवाचा सगळा इतिहास सांगतो की आपण याच जातीभेदाच्या कारणाने या दशेला येऊन ठेपलो.

कॉंग्रेसने जातीय एकता निर्माण करण्याचा विडा उचलल्याला अर्ध्या शतकाहून अधिक काळ लोटला. जी काही थोडी-फार एकता निर्माण करण्यात ते सफल झाले, त्याचे फलितसुद्धा आपण पाहत आहोत आणि दोन राज्य वगळता उरलेल्या सर्वच राज्यांच्या शासनाची कळसुत्री कॉंग्रेसच्याच हाती आहे. (सिंधचे सरकार सुद्धा कॉंग्रेसच्या प्रभावाला मान्यता देते.) परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मानसिकतेमध्ये आपण काय पाहत आहोत? कॉंग्रेसचे मोठे-मोठे हिंदू नेते जिथे एकीकडे जातीय ऐक्याच्या गर्जनांच्या आरोळ्यांनी आकाश-पाताळ एक करताहेत, तिथे दुसरीकडे “भारतीय संस्कृती” आणि हिंदू धर्माच्या प्रेमामध्ये तसुभरही मागे राहू इच्छित नाहीत. त्यामुळेच ते आपापल्या छोट्याश्या जातीय़ परिघातून बाहेर येण्याची हिंमतही करत नाहीत.  कायस्थ कॉंग्रेस नेते कायस्थ जातीचे ऐक्य आणि पुढारपणाची काळजी खुप जास्त वाहतात. जेव्हा त्यांचे लग्न किंवा जन्म-मृत्यू  आपल्याच जातीमध्ये होणार असेल तर त्यांचे तर विश्वच कायस्थांमध्ये आहे. कायस्थ नातेवाईकांना-भलेही ते योग्य असो की  अयोग्य, त्यांच्या आणि त्यांच्या परिवारासाठी काहीतरी उपजीविकेचा प्रबंध करणे तर गरजेचे आहे-काहीतरी नोकरीची व्यवस्था करावीच लागेल आणि अशा जाती-भक्तांच्या कामासाठी कोणताच अन्याय, अन्याय असत नाही; पाप, पाप असतच नाही. भूमिहार (शेतकरी) कॉंग्रेस नेते आहेत. जोपर्यंत भूमिहार जातीपेक्षा स्वतंत्र त्यांचं काही नातं-गोतं  नाही, तोपर्यंत ते कसे काय भूमिहारांच्या बाहेरच्या दुनियेला त्यांची दुनिया समजतील? आपल्या नेत्यांमध्ये ही जातीयतेची भावना किती दृढ आहे, हे  सगळेच जाणतात. याच भावनेमुळे आपले सार्वजनिक आयुष्य अतिशय घाण झाले आहे, आणि राष्ट्रीय शक्ती सबळ होत नाहीये. राजकीय गट तर पहिल्यापासूनच आहेत, यामध्ये जातीय गटबाजी या अवस्थेला आणखीनच भयंकर बनवते. हा जातीवाद फक्त हिंदू नेत्यांमध्येच आहे, असे नाही, तर मुसलमान आणि इतरसुद्धा यापासून वाचलेले नाहीत. मुस्लिमांच्या वरच्या जातीतील नेत्यांच्या स्वार्थ आणि संकुचितपणामुळे तिथेसुद्धा मोमीन आणि गैर-मोमीनचा प्रश्न उपस्थित झालाय. अद्यपी मुस्लिम  नवाबांचा आणि शेठ-सावकारांचा बरोबर असा प्रयत्न राहिलाय की बाजा आणि गोहत्येचा प्रश्न उभारून खालच्या श्रेणीतील लोकांना त्या प्रश्नापासून वेगळं ठेवावं. परंतु निश्चितच यात अपयश येईल. राष्ट्रीय नेत्याची दृष्टी अतिशय व्यापक असली पाहिजे. त्याचा अभ्यास आणि अनुभव विस्तृत असतो आणि या प्रकारे तो भविष्याविषयी अधिक दूरपर्यंत विचार करू शकतो. परंतु त्यांची अशी ही शोचनीय मनोवृत्ती आहे. बिहार राज्यातील कॉंग्रेसी नेते आणि मंत्र्यांच्या या जाती-पातीच्या भावनेने अतिशय  घृणास्पद स्वरूप धारण केले आहे. मंत्री आपल्या जातीच्या सदस्यांची ठोस जमात आपल्या मागे ठेवून त्याच दृष्टिकोणातून काम करतात आणि परिस्थिती येथपर्यंत येऊन पोहोचली आहे, की जर दृष्टिकोणामध्ये परिवर्तन नाही झाले, तर सार्वजनिक जीवनातील घाण पराकोटीला पोहोचेल.

ह्या सगळ्या घाणी त्याच लोकांकडून पसरविल्या गेल्या आहे, जे धनी आहेत किंवा धनिक होऊ पाहताहेत. पैसा जमा करून ठेवणे किंवा त्याची राखण करणे, हा विचार या सर्वांमागे आहे. गरीब आणि स्वत:च्या कष्टाची कमाई खाणाऱ्यांचेच सर्वात जास्त नुकसान होते. परंतु शतकांनुशतकांपासून जाती-पाती विषयी लोकांमध्ये जो विचार  निर्माण केला गेलाय, तो त्यांना आपल्या वास्तविक परिस्थितीकडे नजर सुद्धा फिरवू देत नाही. स्वार्थी नेता स्वत:च यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहेत.

जगाच्या गतिकीचे ज्ञान आपल्याला सांगत आहे, की आपण अधिक काळपर्यंत या जातीय भेदभावाला कायम ठेवू शकत नाही. जगाच्या चाली-रितींना पाहून आता भारतातील अस्पृश्य, अस्पृश्य बनून राहायला तयार नाहीत, अर्जल (कनिष्ठ जाती), अर्जल राहण्यास तयार नाहीत. अस्पृश्य आणि कनिष्ठ बनवून ठेवत फक्त त्यांच्याशी अपमानजनक वर्तन केले जात नाही, तर आर्थिक स्वातंत्र्यापासून सुद्धा त्यांना वंचित ठेवले जातेय. मग ते का समाजामध्ये शतकानुशतके ठरवून दिलेल्या स्थानी राहणे पसंत करतील आणि स्वातंत्र्याच्या चाहत्यांनी तर या प्रथेविरूद्ध जिहाद पुकारलाय. ते यासाठी सर्व प्रकारचा त्याग करण्यास तयार आहेत. त्यांच्यासाठी राजकीय युद्धापेक्षा हे सामाजिक युद्ध काही कमी महत्वाचे नाही. ते ओळखून आहेत, की जोपर्यंत या जातींच्या दऱ्या बुजविल्या जाणार नाहीत, तोपर्यंत जातीय ऐक्याचा मजबूत पाया रचता येणार नाही. त्यांना माहितीये, की या मार्गामध्ये त्यांचा धर्मच त्यांच्यासाठीचा मोठा अडथळा आहे. परंतु ते कधी धर्माची भीड ठेवणार आहेत? ते जाती-पातीच्या सोबत हिंदू धर्माला एकाच दांड्याने मारून समुद्रात बुडवतील.

वरवर पाहता जाती-पातीची इमारत मजबूत वाटते. परंतु यावरून असे वाटले नाही पाहिजे की तिच्या पायावर जोरदार आघात होत नाहीयेत. जातीभेदाचे दोन प्रकार आहेत. एक, अन्नामध्ये शिवाशीव आणि दुसरा, मुलींच्या बाबतीत असहयोग. अन्नामधील अस्पृश्यता त्याच श्रीमंतांनी अगोदर मोडीत काढायला सुरूवात केली, जे आपल्या स्वार्थाला अबाधित ठेवण्यासाठी जातीय संघटना आणि जातीय एकतेचे सर्वात मोठे पोषणकर्ते होते. त्यांच्याकडे धन  होते आणि विदेशात जाण्यासाठी सर्वांच्या अगोदर तेच तयार झाले. जिथे अगोदर विदेशी जाणारे जातीतून बहिष्कृत केले जात होते, तिथे आज तेच जातीचे प्रमुख आहेत. दरभंगा बिकानेरच नाही तर दुसऱ्या जातीतील पुढे आलेल्यांना सुद्धा पाहून घ्या.  सर्व ठिकाणी  विदेशामध्ये सर्व प्रकारच्या लोकांसोबत, सर्व प्रकारचे खाद्यान्न खाऊन परतलेले लोकच आज नेते पदावर विराजमान आहेत. आई. सी. एस. जावई मिळवण्यात सासरा स्वत:ला  भाग्यशाली समजतो.

मागील वीस वर्षांपासून भाकरीची एकता मोठ्या गतीने रूढ होत आहे. 1921 च्या अगोदर हिंदूंचे हाॅटेल कदाचित कुठेतरीच दिसायचे. परंतु आज छोट्या-छोट्या शहरांंमध्येच चार-चार, सहा-सहा डझन हाॅटेल नाहीत, तर छोट्या-छोट्या स्टेशनांवर सुद्धा हॉटेल उघडलेले आहेत. काही वर्षे अगोदर पर्यंत कुणाला वाटत होते की छपरा स्टेशनच्या प्लॅटफाॅर्मवर हिंदू दुकानवाला मटन-पराठे विकत फिरेल. माझे एक मित्र एक दिवस पटन्यात हाॅटेलमध्ये जेवायला गेले. त्यांच्या बाकड्याच्या बाजूला एक मुलगा बसला होता आणि त्याच्या बाजूला एक मिथिलेचे (तिरहुतिये) ब्राह्मण चंदनाचा टिका लावून बसला होता. बाकडं छोटं असल्यामुळे मुलाचा हात ब्राह्मण देवांच्या शरीराला लागला. तो एकदम लालेलाल झाला आणि रागात जात विचारू लागला. आमच्या सहकाऱ्याने  मुलाला गुपचूप सांगितले-म्हण रैदास भगत(चांभार). मुलाने जेव्हा असे सांगितले, तेव्हा ब्राह्मणाच्या तोडातील घास तोंडातच राहिला. तो आता बोलण्यासाठी काही विचारच करत होता, की आजूबाजुचे लोक त्याच्यावर एकदम चिडले-हे हाॅटेल आहे, इथे डाळ-भाताची विक्री होते. तू जात-पात का विचारली? ब्राह्मणदेव विचित्र परिस्थितीत सापडले. जर जेवण सोडून निघून जावं, तर फक्त पैशांचाच भुर्दंड पडेल, असे नाही तर सर्व लोकांना उघड-उघड खिल्ली उडवण्याचा मौका मिळेल म्हणुन बिचाऱ्याने खाली मान घालून गुपचूप जेवण उरकून घेतले.

भाकरीच्या शिवाशिवीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटल्यासारखाच आहे. शिकलेले तरूण यामध्ये हिंदू-मुस्लिमचा भेदभाव पाळू इच्छित नाहीत. परंतु लग्नाचा प्रश्न अजूनही अवघडच दिसतोय. एक दिवस रेल्वेत प्रवास करत असताना मला एक मुस्लिम नेते भेटले.  ते समाजवादी नावाने जरा जास्तच घाबरलेले होते. म्हणाले, समाजवादी जर लोकांचे दारिद्र्य हटवू पाहत आहेत तर इस्लामसुद्धा मसावातचा (समानतेचा) प्रचारक आहे. परंतु ते धर्माच्या विरोधात का आहेत?

मी:- “साम्यवादी धर्माच्या विरोधात आपली ताकद तिळभरही खर्चू इच्छित नाहीत. त्यांना तर वाटते की जगात अन्याय आणि गरिबी राहिली नाही पाहिजे.”

मौलाना: “यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत.”

मी:- “तुम्ही सुद्धा सोबत आहात? काय तुम्ही  सर्व भारतीयांशी रोटी-बेटी व्यवहार करण्यास तयार आहात?”

मौलाना:- “याची काय आवश्यकता आहे?”

मी:-   “कारण गरीब तोपर्यंत स्वातंत्र्य नाही मिळवू शकत जोपर्यंत आपली कमाई स्वत:  खाण्याचा हक्क नाही मिळवू शकत, जोपर्यंत कि ते एकजूट होऊन आपल्या शोषणकर्त्याचा (ते देशी असोत वा विदेशी) सामना करून त्यांना पराभूत नाही करत.”

मौलाना:- “रोटीपर्यंत  तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु बेटीमध्ये नाही.”

जवळच एक पंडीतजी बसलेले होते, जे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे वकील वाटत होते. ते एकदम बोलले – “तुम्ही तर दुसऱ्या देशाच्या साच्यामध्ये भारताला सुद्धा बसवू पाहत आहात. तुम्ही लोक हा विचार करण्याचं कष्ट नाही करत की हिंदुस्तान धार्मिकतेला मानणारा देश आहे, याची सभ्यता आणि संस्कृती वेगळी आहे.  भारताचा युरोप नाही होऊ शकत. रोटीचा प्रश्न तर चला सुटल्यासारखाच आहे, परंतु बेटी प्रश्नावर ऐक्य होण्याची गोष्ट करून तुम्ही शेख चिल्लीवर सुद्धा मात करत आहात.”

मी:- “काही वर्षांपूर्वी रोटीतील ऐक्य सुद्धा शेख चिल्लीचीच बात होती. जाऊ द्या, आज तुम्ही तिला तर मान्य करत आहात ना? बेटीची बात सुद्धा शेखचिल्लीची नाही. वीस वर्षांपूर्वीच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीला पाहून कोणाला तरी आशा होती का, की आजचा दिवस पहावा लागेल?  हिंदू उघड-उघड मुसलमान आणि इसाईंसोबत जेवण करतात, परंतू कोणत्याही जातभाईंची  हिंमत आहे का त्यांच्याशी नाते-संबंध तोडायची? हिंदू-मुसलमानांमध्ये विवाह व्हायला लागलेत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतणीने मुसलमानासोबत लग्न केले तेही कलमा न पढता. आसफ अलींची पत्नी अरूना यांनी मुस्लिम धर्म स्विकारला नाही. प्रोफेसर हुमायूं कबीर यांनी सुद्धा बंगालमध्ये याच प्रकारचे लग्न केल आहे. अशी डझनभर उदाहरणं सापडतील की ज्यामध्ये हिंदू मुलींनी लग्नानंतरही आपला धर्म बदलला नाही. हिंदू नवयुवक सुद्धा धर्माच्या बेड्या तोडून आंतरधर्मीय विवाह करताहेत. गोरखपूरमधील श्री शामाचरण शास्त्रींनी कोणताही शुद्धी-विधी न करता मुस्लिम मुलीशी विवाह केला आहे . गुजरातमध्ये एका उच्चभ्रू कुळाच्या हिंदू युवकाने  प्रतिष्ठित मुस्लिम सुशिक्षित मुलीशी लग्न केले आहे. हे निश्चितच आहे की दिवसेंदिवस अशा विवाहांची संख्या वाढतच जाणार आहे. समाजाच्या मजबूत भिंतीमध्ये जिथे सुई इतकेही भोक पडले ते पुन्हा भरून निघणे अवघड आहे.”

जात पात लाथाडून एकाच धर्मात झालेले विवाह तर यापेक्षाही जास्त आहेत. परंतु आमच्या देशाचे दुर्भाग्य आहे की जे काम निश्चितच केले पाहिजे, त्याला सुद्धा लोक अगदी संथपणाने करू पाहतात. जातींचे मजबूत ऐक्य आपल्यासाठी सगळ्यात आवश्यक बाब आहे आणि ती धर्म आणि जातींच्या भिंतींना पाडूनच कायम केल्या जाऊ शकते. आपली सामाजिक गती  जिला आवश्यक बाब म्हणून सांगत आहे, जी पूर्ण करण्याशिवाय  आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, तिला इतक्या ढिलेपणाने करणे हा मूर्खपणा नाही तर काय आहे?

हिंदुस्तानी जाती एक आहेत. सर्व हिंदुस्तानी जरी ते हिंदू असोत वा मुस्लिम, बौद्ध असोत वा ख्रिस्ती, धर्माला मानणारे असोत वा निधर्मी; त्यांची एकच जात आहे-हिंदूस्तानी, भारतीय. हिंदुस्तानच्या बाहेर युरोप आणि अमेरिकेतच नाही तर शेजारच्या इराण आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आपल्याला हिंदी याच नावाने संबोधले जाते. हिंदूसभेवाले त्यांच्यातील जातीयता तोडण्यासाठी भलेही पाहिजे तेवढा उत्साह दाखवत नसतील, परंतु ते वेळोवेळी ही घोषणा जरूर करत असतात की हिंदू जाती वेगळ्या आहेत. मुस्लिम लिगने तर विडाच उचललाय की मुस्लिमांची सदासर्वकाळासाठी एक वेगळी जात असावी.  ते तर याच विचारधारेच्या आधारावर हिंदुस्तानला  दोन वेगवेगळ्य़ा भागांमध्ये विभागू पाहतात.  नऊ करोड मुस्लिमांमधील सात करोड मुस्लिमांमध्ये तेच रक्त आहे जे हिंदूंच्या शरिरात वाहतेय आणि उरलेले दोन कोटी मध्ये कितीजण आपल्या छातीवर हात ठेवून म्हणू शकतात की त्यांच्यामध्ये एक चतुर्थांश सुद्धा गैर हिंदूस्तानी रक्त आहे? जातीचा निकाल रक्ताने लावला जातो आणि या कसोटीवर तपासणी केल्यावर जगातील कोणतीच व्यक्ती-हिंदुस्तानच्या बाहेर-हिंदुस्तानच्या मुस्लिमांना वेगळी जात मानण्यास तयार होणार नाही. तीन चतुर्थांश अरबी शब्द बोलून भारतीय मुसलमान ना अरब मध्ये जाऊन ‘हिंदी’  सोडून काही अन्य म्हणून ओळखला जाईला, ना अरबी बोलीला तो आपली मातृभाषा बनवू शकेल. आमचे नवयुवक या विभाजनाला अधिक काळ सहन करू शकत नाहीत. नव्या बालकांसाठी तर हे चांगले होईल की हिंदूंची मुले आपलं नाव मुसलमानी ठेवतील आणि मुसलमानांची मुले आपलं नाव हिंदू ठेवतील. सोबतच धर्मांना जबरदस्त विरोध केला जावा. रंग-रुपाच्या बनावटी भेदाला नष्ट करावे. या पद्धतीने धर्माच्या वेड्यांना आम्ही चांगली शिकवण देऊ शकू.

निश्चितच जाती-पातीचा विनाश केल्याने आमच्या देशाचे भविष्य उज्ज्चल होऊ शकेल.

कामगार बिगुल, जुलै 2018