ऑक्टोबर क्रांतीच्या स्मृतींतून प्रेरणा घ्या! नव्या शतकाच्या नव्या समाजवादी क्रांतीची तयारी करा!!
ऑक्टोबर क्रांतीने मानव इतिहासामध्ये एक निर्णायक विच्छेद घडवून आणला आणि एका नव्या युगाचा आरंभ केला. समाजवादी संक्रमाणाचे युग. या युगाच्या आरंभानंतर कामगार वर्गाने इतर देशांमध्येसुद्धा समाजवादी प्रयोग करून , प्रामुख्याने चीनमध्ये, नवे मापदंड स्थापन केले आणि नवे चमत्कार केले. परंतु हे सर्वच प्रयोग म्हणजे पहिल्या टप्प्यातील समाजवादी प्रयोग होते. कामगार वर्गाने आपल्या किशोरावस्थेमध्ये काही महान केले परंतु त्यांत त्रुटी होत्या. पहिल्या टप्प्याच्या प्रयोगांनंतर आपण एका दीर्घ निराशेच्या टप्प्यातून जात आहोत. परंतु आता या निराशेच्या टप्प्याचासुद्धा शेवट जवळ आला आहे. भांडवली व्यवस्था जगाला काय देऊ शकते ते आपण पाहतो आहोत. विसाव्या शतकातील हे सगळे प्रयोग म्हणजे आपणा कामगारांचा सामूहिक वारसा आहे आणि या वारशाची नक्कल करून नाही तर त्याच्याकडून वैज्ञानिक दृष्टीने धडा घेऊन आपण एकविसाव्या शतकात नव्या समाजवादी क्रांतीच्या प्रयोगांची अंमलबजावणी करू शकतो.