Category Archives: धर्म

कोरोना लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही जात-धर्म-वंशवादी, अवैज्ञानिक प्रचार सुरूच

खरे पाहता कोरोनाविषाणूच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही हा रोग होऊ शकतो. जात, धर्म किंवा अन्न न पाहता तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. पण अनेकांनी तर कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शाकाहारी व्हा असा उपदेश केला, जो पूर्णपणे चुकीचा आणि मूर्खपणाचा आहे. या खोट्या उपदेशामध्ये भर म्हणून हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी जाहीर केले कि “कोरोना हा विषाणू नसून छोट्या जीवांच्या रक्षणासाठी आलेला एक अवतार आहे. त्यांना खाणाऱ्यांना मृत्यू आणि शिक्षेचा संदेश देण्यासाठी तो आला आहे. भारतीयांना विषाणूला घाबरण्याची काहीही गरज नाही; कारण ईश्वराची पूजा आणि गाईची रक्षण करण्यात विश्वास ठेवणारे भारतीय या विषाणूपासून सुरक्षित आहेत.”.

कोरोनाच्या काळात अफवा आणि अंधश्रद्धांचा सुळसुळाट!

भारतीय समाजातील अंधश्रद्धा पुन्हा एकदा कोरोनाच्या निमित्ताने बोकाळून आल्या आहेत. सर्वधर्मीय बाबा-बुवांनी लाज आणेल अशाप्रकारे कोरोनाला संपवणाऱ्या औषधी आणि उपाययोजना शोधल्या आहेत आणि व्हॉट्सअप वरचे योद्धे या अंधश्रद्धांना जीवापाड मेहनत करून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. माझा धर्म मोठा की तुझा या साठमारीमध्ये, आणि धार्मिक-जातीय़ वर्चस्वाच्या विचारांनी ग्रासलेल्या समाजामध्ये कोरोना सारख्या साथीला प्रतिबंध करणे अजून अवघड काम बनवले आहे.

केवळ आसाराम नाही तर संपूर्ण धर्माची लुटारू वृत्ती ओळखा

सर्वसामान्य लोकांमध्ये आज प्रचंड प्रमाणात सामाजिक आर्थिक असुरक्षा आहे. या व्यवस्थेबाबत तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन नसल्यामुळे देव, भूतबाधा, जादूटोणा, पूजापाठ यावर लोकांचा विश्वास आहे. विविध धर्मांमध्ये याबाबत विविध रीती-रिवाज आहेत. शोषक वर्ग नेहमी जनतेच्या धार्मिक विश्वासांचा गैरफायदा उठवून त्यांचे आर्थिक-सामाजिक-राजकीय शोषण करीत आलेले आहेत. धर्म ही वास्तवात पारलौकिक गौष्ट नसून नेहमी लौकिक म्हणजे या जगाशी संबंधित अशीच आहे. शोषक वर्ग हा नेहमी आपल्या सशस्त्र ताकदीच्या जोरावर राज्य करतो. सध्याच्या भांडवलदारी व्यवस्थेपूर्वी गुलामगिरीच्या काळात गुलाम आणि त्यांचे मालक, सरंजामशाहीच्या काळात राजे-राजवाडे हे धार्मिक विचारांचा आधार घेऊन राज्य करीत होते. राजा हा विष्णूचा अंश आहे, अशा प्रकारचे विचार वर्णव्यवस्थेत पसरवले जात. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांची गुलामगिरी पत्करायला सहजपणे तयार होत असे. हेच या शोषणकारी व्यवस्थेचे दैवतीकरण होते. परंतु आज भांडवलदारी व्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती नाहीये. या व्यवस्थेचे दैवतीकरण झालेले नाहीये. मात्र आजही धर्म हा भांडवलदारी वर्गाच्या हातात राज्य करण्याचे महत्त्वाचे हत्यार आहे.

मुद्दा फक्त ‘ढोंगी’ बाबांचा नाही

आज धर्माचं पूर्णता भांडवलीकरण झालं आहे. गुरमीत पासून राधेमा पर्यंत त्याचं हे रूप अतिशय विकृत व कुरूप आहे. भांडवली राजकारणाशी याचं असलेलं साटंलोटं समजायला व भांडवली व्यवस्थेनं निर्माण केलंलं दु:ख, दारिद्रय अनिश्चितता व भीतीचा ठाव घ्यायला सामान्य जनतेची वैज्ञानिक तर्कबुद्धी अजून तितकीशी सक्षम नाही. याची कारणं प्रबोधन व पुनरुज्जीवानाच्या न लाभलेल्या वारश्यात शोधता येतात. भांडवली व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात जनतेनं उभं करू नये म्हणून दैववादाचा उपयोग जनतेची मती बधीर करायला केला जातो. यासाठीच अशा बाबाबुवामाताचं पालनपोषण केलं जातं. सगळे बाबा एकजात धूर्त, प्रतिक्रियावादी, कट्टर फासीवादी प्रवृत्तीचे आहेत. निर्भया बलात्कारानंतर आसारामची भाषा असो की साक्षी महाराजाची  बेताल वक्तव्य असो, मग ते कुठल्याही धर्मातले असोत ते घोर स्त्री विरोधी, धर्मांध, तर्कदुष्ट व विज्ञानविरोधी आहेत यात शंकाच नाही. निश्चितच या बाबा बुवांच्या जाळ्यांतून सामान्य जनतेला सोडवायला तिचं प्रबोधन तर करायलाच हवं पण सोबत एक अशी जमिनही घडवायला हवी जीथं ही विषारी बीजं अंकुरणारचं नाहीत कधीही. मुद्दा फक्त ‘ढोंगी बाबाचा’ नाहीच. 

पैशाच्या परगण्यात अध्यात्माचा धिंगाणा!

आपल्या प्रिय भारत देशाला कृषिप्रधान म्हणण्याबरोबरच बाबाप्रधान देश म्हटले तर काही अतिशयोक्ती होणार नाही. असे म्हणण्याचे कारण अगदी उघड आहे. इथे आपल्याला डाल डाल पर चिडिया का बसेरा तर कुठे दिसणार नाही पण इथे तिथे सगळीगडे बुवा (आणि बायासुद्धा) निश्चितच दृष्टीस पडतील. यांच्या कपड्यांवरून आपण या सगळ्यांना एका तागडीत तोलण्याचा प्रयत्न कराल तर हमखास घोटाळा होईल. यांचे वेगवेगळे प्रकार आहे आणि हे वेगवेगळे प्रकार एकदुसऱ्यापासून पूर्णपणे भिन्नसुद्धा आहेत. सर्वांचे आपापल्या भक्तांचे वेगळे स्वतंत्र साम्राज्य आहे आणि हे साम्राज्या टिकवून ठेवण्याचे वेगवेगळे डावपेचही आहेत.

कुठवर अंधश्रद्धेच्या बळी ठरत राहतील महिला?

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानुसार २००८ ते २०१३ या वर्षांमध्ये अशाच प्रकारे झारखंडमध्ये २२० महिलांना, ओरिसामध्ये १७७ महिलांना, आंध्रप्रदेशमध्ये १४३ महिलांना आणि हरयाणामध्ये ११७ महिलांना हडळी घोषित करून मारून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. या कालावधीमध्ये देशभरात अशा प्रकारे २२५७ हत्या करण्यात आल्या. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आकडे वास्तविक चित्र सादर करीत नाहीत, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये मृतांचे कुटुंबिय गुन्हेगारांच्या दहशतीपायी तक्रार नोंदवीत नाहीत किंवा पोलिस अशा घटनांची नोंद करण्यास टाळाटाळ करतात.