28ऑगस्ट, महान जातीविरोधी योद्धे अय्यंकालींच्या जन्मदिनानिमित्त
अय्यंकालींचा जातीअंताचा वारसा पुढे न्या!

सुस्मित

ज्यावेळी भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत होता त्याच वेळी राजस्थानच्या जालोरमध्ये एका 9 वर्षाच्या मुलाला स्वत:ला उच्च जातीय समजणाऱ्या शिक्षकाने सवर्णांसाठीच्या मडक्यातले पाणी पिले म्हणून इतके मारले की उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला; 10 एप्रिल 2022 रोजी उत्तरप्रदेशात एका दलित मुलाला उच्च जातीय मुलाचे पाय चाटायला लावले गेले, जातीय शिवीगाळ करण्यात आली; मार्च 2022 मध्ये एका दलित माहिती अधिकार कार्यकर्त्याला मध्यप्रदेश मध्ये मारहाण केली गेली आणि मूत्र प्यायला लावले. अशा जातीय हिंसाचाराच्या घटना आजही देशात घडत आहेत. या घटनांनी हे स्पष्टच आहे की स्वतंत्र भारताने कागदावरून अस्पृश्यता नष्ट केली असली तरी जमिनीवर ती अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे आजच्या शोषणकारी व्यवस्थेच्या विरोधातल्या लढ्यात जातीच्या प्रश्नाला विचारात घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. यासाठीच इतिहासातल्या महान नेत्यांना आठवणे गरजेचे आहे ज्यांनी जाती विरोधात झुंजार संघर्ष केला. असेच एक महान योद्धे म्हणजे अय्यंकाली.  अय्यंकाली केरळमधील जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी  ब्राह्मणवादाविरुद्ध आणि त्याला पोसणाऱ्या सामंतवाद, ब्रिटीश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर विश्वास ठेवून क्रांतिकारी लढे उभे केले. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते. अय्यंकालीना आज आठवणे खूप महत्त्वाचे आहे कारण आज जातिअंताची चळवळ सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या दलदलीत फसली आहे. लेखाच्या पुढील भागात आपण अय्यंकालींच्या जीवनकार्याबद्दल माहिती घेऊ तसेच आजच्या जातिअंताच्या चळवळीसाठी काही महत्त्वाचे धडे सुद्धा घेऊ.

कोण होते अय्यंकाली?

अय्यंकालींचा जन्म 28 ऑगस्ट 1863 ला ब्रिटीश भारतातील दक्षिणेकडील त्रावणकोरच्या संस्थानातील तिरूवनंतपुरम जिल्ह्याच्या वेंगनूर मध्ये झाला. त्यांचा जन्म केरळमधील सर्वाधिक दमित आणि अत्याचारित दलित जातींमधील एक असलेल्या पुलयार जातीमध्ये झाला. त्रावणकोर मध्ये पुलयार लोकांना ब्राह्मणवादी उतरंडी मध्ये सर्वात खालचे स्थान देण्यात आले होते.  त्यांना नायर जातीच्या जमीनदारांपासून इतर सर्व तथाकथित उच्चजातीयांकडून होणारे अपमान आणि दमन सहन करावे लागत होते. या स्थितीने अय्यंकालींच्या मनात बंडाची आग लावली. सुरूवातीला तर ते आपल्या इतर पुलयार मित्रांसोबत शेतमजुराचे काम केल्यावर अशा गीतांची आणि नृत्याची निर्मिती करू लागले जे या स्थितीच्या विरोधात आवाज उचलत होते. यामुळे अनेक युवक दलित त्यांना येऊन मिळू लागले. अय्यंकाली सुरूवातीपासूनच समजत होते की उच्च जातींद्वारे दलितांचे दमन आणि त्यांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या हिंसेच्या प्रश्नावर इंग्रज सरकार काहीच करणार नाही. त्यामुळे या दमन आणि हिंसेचे उत्तर त्यांनी स्वत: रस्त्यावर देण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या आजूबाजूला युवकांचा एक समूह अस्तित्वात येऊ लागला आणि हा समूह प्रत्येक हल्ल्याचे उत्तर ब्राह्मणवाद्यांना रस्त्यांवर देऊ लागला. ही हिंसा खरेतर आत्मरक्षणासाठी केली जाणारी हिंसा होती. पण या प्रकारच्या पलटवाराने ब्राह्मणवादी शक्ती धाकात आल्या. अय्यंकालींच्या या मार्गावर चालण्यामुळे दलित सामान्य कष्टकरी जनता त्यांच्यावर प्रेम करू लागली आणि त्यांना अनेक उपाधी दिल्या, जसे की उर्पिल्‍लई आणि मूथपिल्‍ला (मोठा भाऊ).

अय्यंकाली अनेक प्रकारच्या धार्मिक सुधारकांनी प्रभावित झाले ज्यामध्ये अय्यावू स्वामिकल आणि नारायण गुरू हे प्रमुख होते. हे दोघेही हिंदू धर्मामधील जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष करत होते. मानवतावाद त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानाचा आधार होता. अय्यंकाली धार्मिक सुधारवादाच्या पुढे गेले नाही. असे असूनही अय्यंकाली सामाजिक आणि राजकीय क्रांतिकारक होते कारण अय्यंकालींना त्या वेळेच्या इंग्रज राज्यसत्तेचे वर्गीय चरित्र समजले होते जे नेहमी ब्राह्मणवादी सामंतांच्या बाजूनेच होते. म्हणून त्यांनी कधीही सरकारला अर्ज, विनंत्या करण्यावर विश्वास ठेवला नाही तर जनतेच्या सामूहिक शक्तीवर त्यांना विश्वास होता. राज्यसत्तेचे कामच शोषणकारी व्यवस्था टिकवून ठेवायचे आहे त्यामुळे त्या सत्तेविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केल्याशिवाय समानतेची आणि अधिकारांची लढाई लढता येत नाही हे त्यांना समजले होते. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जरी ते भौतिकवादी नसले तरी समानतेच्या लढाईत ते कुठल्याही ईश्वरी शक्तीवर अवलंबून राहिले नाहीत तर जनतेच्या संघटित शक्तीद्वारे बळाच्या वापराचे महत्त्व समजून होते. त्यांच्या आयुष्यात लढलेल्या आंदोलनांतून हे दिसून येते.

अय्यंकाली यांनी लढलेली आंदोलने: स्वातंत्र्य फेरी आणि चेलियार जनविद्रोह

अय्यंकालींच्या वेळची सामाजिक स्थिती ब्रिटिश इतिहासकार रॉबिन जेफ्री यांच्या खालील परिच्छेदावरून समजून घेता येऊ शकते. “एक  नायर नंबुद्रि ब्राम्हणाजवळ जाऊ शकतो पण शिवू शकत नाही; एखाद्या एझवाने 36 पावले आणि पूलयान गुलामाने 96 पावले अंतर ठेवावे. एझवाने नायर पासून 12 पावले आणि पूलयान गुलामाने 66 पावले अंतर ठेवावे. एखादा सिरियन ख्रिश्चन नायरला शिवू शकतो पण त्यासोबत खाऊ शकत नाही. पुलयार आणि परयार, जे सर्वाधिक खालच्या जातीचे आहेत, ते एकमेकाजवळ येऊ शकतात पण शिवू शकत नाही.” अशा परिस्थितीत जेव्हा दलितांना सार्वजनिक रस्त्यांवरून चालायला बंदी होती, गुढघ्यापर्यंत वस्त्र परिधान करण्याची सक्ती होती, गळ्यात दगड अडकवून चालण्याची सक्ती होती अशा वेळेस अय्यंकालींनी या सर्व अत्याचारांविरोधात निर्याणक लढा दिला. 1863 मध्ये अय्यंकाली सार्वजनिक रस्त्यावरून बैलगाडी (विल्लूवंडी) घेऊन, पांढरी लुंगी, पांढरा सदरा (अंगवस्त्रम), पांढरी पगडी (थलपव्वू पगडी) घालून रस्त्यावरून निघाले. अय्यंकालींवर ब्राह्मणवाद्यांनी अनेक ठिकाणी हिंस्त्र हल्ले केले पण अय्यंकाली डगमगले नाहीत आणि जशास तसे उत्तर देत गेले. यानंतर अशा कृतींची केरळमध्ये लहरच पसरली आणि अनेक ठिकाणी उच्चजातीय आणि दलितांमध्ये संघर्ष झाले ज्याला इंग्रजांनी चेलीयार दंगली म्हटले. पण शोषक वर्ग नेहमीच जनतेच्या विद्रोहांना बदनाम करण्याचे काम करत असटो. पण यामुळेच 1900 सालापर्यंत दलितांना सार्वजनिक रस्त्यावरून चालण्याचा अधिकार मिळाला होता.

केरळ मधील पहिला कामगारांचा संप

1905 मध्येच अय्यंकालींनी शेतमजुरांचा पहिला ऐतिहासिक संप घडवून आणला. त्यात कामगारांच्या अनेक महत्तवपूर्ण मागण्या होत्या. त्यात मजुरांना फिरण्याचे स्वातंत्र्य, मुलांना शाळेत प्रवेश, तसेच गैर हंगामाच्या काळात पगार मिळाला पाहिजे, कामा दरम्यान विश्रांती, पैशाच्या रूपात मजुरी या मागण्या होत्या. अशाप्रकारे अय्यंकालींनी कामगारांची वर्गीय एकजूट बांधून संघर्ष केला, आणि अस्मितेचे राजकारण नाकारले.  अय्यंकाली समजत होते की दलितांच्या शोषणाचे मूख्य कारण ते संपत्ती संबंध आहेत जे सवर्ण जातींना बळकट करतात.

शाळांमध्ये प्रवेशासाठी लढा

त्या काळी दलितांना शाळांमध्ये शिकायला बंदी होती. त्यामुळे अय्यंकालींनी दलितांसाठीच्या शाळा काढल्या. पण ब्राह्मणवाद्यांनी अनेक शाळा जाळून टाकल्या. अय्यंकालींनी साधु जन प्रपालना परिषद (गरिबांच्या रक्षणासाठी संघटन) बनवले ज्यांनी दलितांना शाळेत प्रवेश मिळण्यासाठी सरकारला निवेदने दिले. त्यामुळे 1907 मध्ये ब्रिटिश सरकारने म्हणायला दलितांना शाळांमध्ये प्रवेशाचा अधिकार दिला पण ब्राह्मणवाद्यांनी हा अधिकार वास्तवात मिळू दिला नाही. अय्यंकालींनी पंचमी नावाच्या एका दलित मुलीचा दाखला एका सरकारी शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या उत्तरामध्ये ब्राह्मणवाद्यांनी दलितांवर हिंस्त्र हल्ले केले आणि ऊरुट्टमबलम मध्ये एका शाळेला जाळून टाकले. यामुळेच अय्यंकालींनी त्यांचा मोर्चा ब्राह्मणवाद्यांविरोधात आणि त्यांना बळ देणाऱ्या सामंती संपत्ती-संबंधांविरोधात वळवला. त्यांनी ब्राह्मणवाद्यांना म्हटले “जर तुम्ही आमच्या मुलांना शिकू दिले नाही तर तुमच्या शेतात गवत उगवेल”. अय्यंकालींनी संपूर्ण केरळमधील दलित शेतमजुरांना एकजूट करवून संप घडवून आणला आणि ब्राह्मणवादी सामंतवर्गाचे नाक दाबले. आर्थिक नाकेबंदी केल्यामुळे सामंतवर्गाला, ब्राह्मणवाद्यांना झुकावे लागले आणि दलितांना शाळेत शिकण्याचा अधिकार मिळाला.

स्त्रियांचे शरीर झाकण्याचा लढा

केरळच्या समाजात ब्राह्मणवाद्यांनी दलितांवर पोषाखाची सक्ती केली होती. त्यांना फक्त गुडघ्यापासून कमरेपर्यंत अंग झाकता येत होते. त्यांना साधा पोशाख घालण्यास बंदी होती. पोशाख थोडा जरी वेगळा घातला तर झाडाला बांधून फटके देण्यात येत. स्त्रियांना सुद्धा शरीराचा वरचा भाग झाकण्यास बंदी होती. नादर लोकांना हा अधिकार 1917 पर्यंत त्यांच्या आंदोलनाने मिळाला होता पण पुलयारांना हा अधिकार मिळायला 1915 उजाडले. अय्यंकालींनी कोल्लम येथे  1915 साली एक सभा बोलावली आणि कळ्ळूमळा (गळ्यातील माळ) आंदोलन छेडले. त्यांनी सभेमध्ये जमा झालेल्या हजारो महिलांना आवाहन केले की गळ्यातील अपमानजनक दगडांच्या माळा झुगारून द्या आणि या आंदोलनाच्या परिणामी पोशाखाच्या अपमानजनक बंधनांपासून मुक्ती मिळवली.

अय्यंकालींपासून आजच्या जातीअंताच्या चळवळीने काय शिकले पाहिजे?

अय्यंकालींनी लढलेल्या सर्व आंदोलनातून हे स्पष्टपणे दिसून येते की अय्यंकालीं मुख्यतः एक सामाजिक, राजकीय क्रांतिकारी होते. अय्यंकालींपासून आजच्या जातीअंताच्या चळवळीला शिकण्यासारखे बरेच काही आहे. पहिले, जनतेची शक्ती आणि पुढाकारावर भरवसा, अर्ज-विनंत्यांपेक्षा जनतेच्या मूलगामी संघर्षावर भरोसा. पण दलित मुक्ती संघर्षाचा मोठा भाग सुधारवाद, व्यवहारवाद आणि अस्मितावादाच्या दलदलीत अडकला आहे. दलितांमध्येसुद्धा असा एक मध्यमवर्ग तयार झाला आहे ज्याला कामगार कष्टकरी दलित जनतेशी कसलेही देणे घेणे राहिले नाही आहे. अशा मध्यमवर्गाला आज जात संपवायची नाही तर टिकवायची आहे कारण याच जातीच्या जोरावर चालणाऱ्या अस्मितावादी राजकारणामुळे त्यांना सत्तेत स्थान मिळत आहे. रामविलास पासवान, मायावती, रामदास आठवले यांसारखे नेते याच व्यवहारवादाची परिणीती आहेत जे आज सत्तेत राहण्यासाठी ब्राह्मणवादी तसेच फॅसिस्ट सत्तेसोबत युती करण्यास मागे पुढे बघत नाहीत. ह्याच शक्ती दलितांच्या जातीय अस्मिता कुरवाळत राहतात आणि जनतेला व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या संघर्षांपासून दूर नेण्याचे काम करतात.

दुसरे हे की जातीविरोधी संघर्षांचा अविभाज्य हिस्सा आहे राज्यसत्तेशी संघर्ष, तिचे वर्गचरित्र ओळखून तिच्या आर्थिक संरचनेशी संघर्ष. अय्यंकालींनी फक्त शिक्षणाचा मुद्दा उचलला नाही तर त्याकरिता कामगारांचा संप घडवला आणि सामंत व ब्रिटीश यांच्या सत्तेला आह्वान देत ते उभे राहिले. आज जेव्हा देशात भांडवली उत्पादन संबंध स्थापित झाले आहेत, आणि भांडवली राज्यसत्ता जातीव्यवस्थेला कामगार-कष्टकऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी वापरत आहे, अस्मितावादी राजकारणाला, सत्तेच्या संरचनेमध्ये छोटा-मोठा वाटा मिळवण्याच्या महत्वकांक्षांना खतपाणी घालत आहे, अशावेळी अय्यंकालींची शिकवण ध्यानात ठेवून राज्यसत्तेशी संघर्षांची रणनिती जातीविरोधी आंदोलनाला अवलंबावी लागेल.

तिसरी गोष्ट ही की जातिअंताच्या आंदोलनाला वर्ग संघर्षाची जोड द्यावी लागेल. अय्यंकालींनी शेतमजुरांचा संप घडवून आणला तेव्हा हीच गोष्ट केली होती. दलित मुक्तीच्या संघर्षामध्ये दलितांसोबत इतर जातींचे कामगार कष्टकरी यांची वर्गीय एकजूट करावी लागेल. त्याशिवाय जातिअंताच्या लढ्याला पुढे नेता येणे शक्य नाही. जाती संपवण्याच्या संघर्षात आपण आपल्या जातींना चिकटून राहिलो तर ही लढाई पूर्णत्वाला नेणे शक्य नाही. आज सर्व कामगार कष्टकऱ्यांना समजून घ्यावे लागेल की त्यांचा शत्रू इतर जातीतला कामगार नसून त्यांच्याच जातीतला श्रीमंत भांडवलदार वर्ग आहे, ज्याने सर्व साधनसंपत्तीवर कब्जा करून सर्वच जातीतल्या कामगारांचे शोषण चालवले आहे.

यामुळेच आज अय्यंकालींच्या क्रांतिकारी वारशासोबत स्वतः ला परिचित करून घेणे महत्वाचे बनले आहे.  अय्यंकाली सत्तेसोबत संघर्ष करणारे नेते होते त्यामुळेच त्यांच्या या चरित्रापासून जनतेला अनभिज्ञ ठेवण्याचे काम राज्यसत्ता करत राहील. त्यामुळेच क्रांतिकारी आणि प्रगतीशील शक्तींची ही जबाबदारी बनते की त्यांनी अय्यंकालींना, त्यांच्या कार्याला जनतेमध्ये घेऊन जावे.

कामगार बिगुल, सप्टेंबर 2022