महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा अमर रहे!
जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ऑक्टोबर क्रांतीने काय दिले?
✍जय
आज जेव्हा जगभरात कामकरी जनता प्रचंड गरिबी, महागाई, बेरोजगारी, धार्मिक दंगली, फॅसिझमचा हल्ला, साम्राज्यवादी युद्धे, या सर्वांना तोंड देत आहे, अशावेळी महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा कामगार वर्गाला सतत प्रेरणा देत आहे की शोषणाचा अंत शक्य आहे! 25 ऑक्टोबर (क्रांत्योत्तर नवीन कॅलेंडर नुसार 7 नोव्हेंबर) 1917 रोजी लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या पुढाकाराने रशियातील कामगार वर्गाने भांडवलदार वर्गाची सत्ता उलथवून टाकली आणि 1871 च्या पॅरिस कम्युन नंतर पुन्हा कामगार वर्गीय सत्तेची स्थापना केली. या घटनेने ना फक्त रशियाच्या इतिहासाला नवीन वळण दिले, तर जगाच्या इतिहासावर कायमची अमिट छाप सोडली आणि इतिहासाच्या संपूर्ण कालक्रमालाच कलाटणी दिली. ऑक्टोबर क्रांतीच्या तोफगोळ्यांचे आवाज जगभर घुमले.
अशा काळात जेव्हा जग पहिल्या महायुद्धात गुरंफटले होते, रशियातील झारशाहीने साम्राज्यवादी ब्रिटेन, फ्रांस, अमेरिकेच्या हितसंबंधांच्या रक्षणाकरिता रशियातील कामगार वर्गाला युद्धात ढकलले. भूक, गरिबी, दुर्दशेला तोंड देणारे रशियातील कामगार आणि शेतकरी ब्रेड, शांतता, जमिनीची मागणी करत होते. या परिस्थितीत झालेल्या फेब्रुवारी 1917 च्या क्रांतीने झारशाहीचे राज्य संपवले आणि संसदीय भांडवली लोकशाही आणली, व केरेंस्कीच्या नेतृत्वाखाली भांडवलदार वर्गाचे राज्य सुरू झाले. परंतु कामगार वर्गाला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या या सरकारने ना युद्ध थांबवले, ना जनतेच्या हालापेष्टा कमी केल्या. जनतेच्या जीवनस्थितीत काहीही फरक पडला नाही. कामगार संघर्ष करत होते आणि त्यांनी स्वत:ला सोवियत या स्वायत्त राजकीय संस्थांमध्ये संघटित होणे चालू केले. सोवियत या सत्तेचे दुसरे केंद्र बनल्या. अशा परिस्थितीमध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविकांनी भांडवली सरकारचा भंडाफोड केला आणि “सर्व सत्ता सोवियतकडे”चा नारा दिला. फेब्रुवारी नंतरच्या 8 महिन्यांमध्ये कामगार वर्गाने आपल्या क्रांतिकारी शक्तीला बोल्शेविकांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणले. 25 ऑक्टोबर 2017 रोजी कामगारांनी केरेंस्की सरकारला भिरकावून दिले, भांडवलदारांना आणि त्यांच्या दलालांना सत्तास्थानांवरून खाली खेचले, सर्व कारखाने, वर्कशॉप्स , शेते यांचा देशभरात कब्जा घेतला आणि कामगार वर्गाच्या राज्यसतेची स्थापना केली . जगातील पहिल्या समाजवादी सत्तेची ही पायाभरणी होती.
इतिहासातील इतर क्रांत्यांच्या विपरीत, ज्यांनी एका शोषक वर्गाच्या जागी दुसऱ्या शोषक वर्गाची सत्ताधारी म्हणून स्थापना केली, ऑक्टोबर क्रांती अशी पहिली क्रांती होती शोषक वर्गांची सत्ता नष्ट करून कामगार वर्गाची सत्ता स्थापन केली. सोवियत सारख्या राजकीय संरचनेद्वारे तिने कामगार वर्गाची खरीखुरी लोकशाही स्थापन केली, ज्याद्वारे कामगार वर्गाने राज्यसत्तेची यंत्रणा चालवण्याच्या प्रक्रियेत, उत्पादन-वितरण याबद्दलचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत, प्रशासनात सक्रीय हस्तक्षेपाद्वारे अशा राज्यसत्तेची स्थापना केली, जी बहुसंख्यांक अशा कामगार वर्गाची अल्पसंख्यांक भांडवलदार वर्गावर अधिनायकत्त्व होते. जनतेच्या मागणीला तत्काळ लागू करत बोल्शेविकांनी युद्ध थांबवले. कामगारांच्या अग्रदलाने सत्तेवर ताबा मिळवत, आणि सत्ता चालवणे शिकले. कामगारांच्या सत्तेने कामाचे तास 8 वर आणले, संपूर्ण शिक्षण सरकारची जबाबदारी बनवले गेले आणि सर्वांसाठी मोफत केले. आरोग्यव्यवस्था सार्वजनिक खर्चाद्वारे मोफत केली गेली. काही वर्षांमध्येच निरक्षरता पूर्णपणे संपवली गेली. महिलांना सार्वत्रिक मताधिकार देणारा रशिया अनेक युरोपातील अनेक देशांच्या अगोदरचा देश होता. स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत सोवियत रशियाने अभूतपूर्व असे कायदे बनवले आणि अतिशय अल्पकाळात आमूलाग्र बदल घडवले. जगातील पहिली महिला ट्रॅक्टरचालक, पहिला महिला अवकाशयात्री सोवियत रशियातच बनली. प्रत्येक कामाच्या जागी पाळणाघरे बनवली गेली, जेणेकरून मुलांचे संगोपन सामाजिक जबाबदारी बनू लागले. अनेक वसाहतींमध्ये कोम्युनाल्का नावाची सामुदायिक स्वयंपाकघरे चालवली जाऊ लागली, जेणेकरून रोजरोजच्या रटाळ स्वयंपाकी कामातून महिलांची सुटका झाली. सर्वत्र समान कामाला समान वेतनाचा कायदा लागू केला गेला. मातृत्वाची आणि बालसंगोपनाची जबाबदारी सरकारने विनामूल्य उचलली. गर्भपात, घटस्फोटाचा अधिकार महिलांना दिला गेला. विनंतीवरून गर्भपाताचा अधिकार देणारा सोवियत रशिया पहिला देश बनला. क्रांतीनंतरच्या लगेचच्या काळात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कायदे रद्द केले गेले. पूर्वीचे गरीब असोत वा श्रीमंत, आता सर्वांची मुले एकाच दर्जाच्या शाळेत शिकू लागली. ‘अग्रेसर युवक’ (यंग पायोनियर) सारख्या योजनांमध्ये सर्वांच्याच मुलांना सारख्या संधी दिल्या जाऊ लागल्या. कामगारांना पगारी रजा, पगारी दीर्घरजा, आणि कामाच्या जागी विम्यापासून ते आरोग्यसुविधेपर्यंत अनेक सुविधा दिल्या जाऊ लागल्या.
‘जो काम करणार नाही, तो खाणार नाही’ या तत्वानुसार रशियाच्या राज्यघटनेमध्ये सर्व सबल नागरिकांना काम करणे सक्तीचे केले गेले आणि मालकवर्गाचा ऐतखाऊपणाचा अधिकार रद्द केला गेला. यासोबतच राज्यसत्तेने प्रत्येकाला कामाची संविधानात्मक हमी दिली, आणि बेरोजगारीला हद्दपार केले. भांडवलशाहीमध्ये, अगदी अमेरिकेसारख्या सर्वाधिक विकसित भांडवलशाहीमध्ये सुद्धा, बेरोजगारी ही कायमस्वरूपी परिघटना आहे कारण भांडवली अर्थव्यवस्थाच बेरोजगारी निर्माण करते आणि टिकवते, परंतु समाजवादी रशियामध्ये बेरोजगारी संपवली गेली कारण उत्पादनाचे उद्दिष्ट भांडवलदारांचा नफा न राहता जनतेच्या गरजा पुरवणे हे बनले. कामगार म्हणून कोणत्याही व्यक्तीने इतर कोणालाही कामावर ठेवणे बेकायदेशीर ठरवले गेले आणि कामगार-भांडवलदार या नात्याचा अंत केला गेला. रोजगाराचा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार देऊन देहविक्रयाच्या त्या घृणास्पद बाजाराला संपवले गेले जो हजारो वर्षांपासून मानवजातीवर काळीमा बनून होता. देशातील संपत्तीच्या वाढीसोबत कामकरी लोकांच्या जीवनाचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा उंचावणे सोवियत राज्यघटनेनुसार सरकारसाठी सक्तीचे बनवले गेले.
एक खरी लोकशाही संरचना उभी करताना भांडवली लोकशाहीच्या पद्धतीला नष्ट करून, तळागाळातून कामगार-शेतकऱ्यांनी निवडलेल्या सोवियतद्वारे सत्तेच्या सर्वोच्च निर्णय करणाऱ्या सोवियत कॉंग्रेसची स्थापना केली गेली. अधिकाऱ्यांच्या निवडणुका होऊ लागल्या. निवडलेल्या व्यक्तींना परत बोलावण्याचा अधिकार जनतेला दिला गेला. सैन्यातही अधिकाऱ्यांच्या निवडीला लागू केले गेले. एका निवडून आलेल्या अधिकाऱ्याचा पगार सामान्य कामगारापेक्षा जास्त नसेल असे कायदे केले गेले. विधानमंडळे आणि कार्यपालिकेतील भांडवली लोकशाहीतील कृत्रिम दिखाव्याचा फरक समाजवादी रशियात संपवण्याकडे नेला गेला आणि कायदे बनवणाऱ्यांवरच त्यांना लागू करण्याचीही जबाबदारी सोपवली गेली. सोवियत सत्ता खऱ्या अर्थाने एक समाजवादी न्यायाच्या तत्त्वावर उभी केलेली, खरी लोकशाही देशस्तरावर लागू करणारी पहिली राज्यसत्ता होती.
ऑक्टोबर क्रांतीने इतिहासात पहिल्यांदा कामगार वर्गाची देशव्यापी राज्यसत्ता स्थापन केली. रशियात सर्व कारखाने कामगारांनी निवडलेल्या समित्यांद्वारे संचालित होत, कामगारांचे समुदाय शेती करत ना की भांडवलदार. निर्माण झालेली सर्व संपत्ती सर्व जनतेची सामुहिक संपत्ती होती आणि जनतेची समृद्धी वाढवण्याकरिता वापरली जात होती, ना की बहुसंख्यांना दारिद्र्यात ढकलून मूठभर भांडवलदारांना अधिक श्रीमंत करण्यासाठी.
ऑक्टोबर क्रांतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती घडवून आणली. यु.एस.एस.आर.च्या (युनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स) सर्व गणतंत्रांमध्ये विज्ञानाच्या प्रगतीसाठी अकादमी स्थापल्या गेल्या, नाउकोग्राड्स नावाचे विज्ञान शहरे स्थापली गेली जिथे अणुभौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग वर संशोधन होऊ लागले. पायाभूत सुविधांमध्ये गगनभरारी झेप घेऊन प्रगती झाली आणि देशभरात असंख्य पूल, मोठमोठे पायाभूत उद्योग (स्टील प्रकल्प, वीज प्रकल्प, इ), रेल्वे, इमारती बांधल्या गेल्या. युरोपाच्या तुलनेत अतिशय मागासलेला असलेल्या रशियाचे विद्युतीकरण पूर्ण केले गेले. अवकाशात मानव पाठवणारा पहिला देश, कृत्रिम उपग्रह बनवणारा पहिला देश तोच सोवियत रशिया होता जो 1917 मध्ये युरोपाच्या तुलनेत कैक दशके मागासलेला होता. क्वांटम भौतिकशास्त्र, सापेक्षतावाद, जैवरसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, इंजिनिअरींग, वैद्यकीय शास्त्र, जीवशास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे शोध सोवियत रशियाच्या वैज्ञानिकांनी लावले. कला, साहित्य आणि संस्कृतीमध्ये अभूतपूर्व उफाळ्या मारून प्रगती झाली. आयझनस्टाईनचा मोंटाज सिनेमा पासून ते समाजवादी यथार्थवादापर्य़ंत अनेक प्रयोग झाले, रशियातील स्थापत्यशास्त्राच्या कंस्ट्रक्टिविझम (निर्मितीवाद)च्या चळवळीने एक नवीन दिशा स्थापन केली. समाजवादी जाणिवेचा नवा मनुष्य घडवण्याच्या दृष्टीने कामगारांची सामुदायिक नाटकमंडळे (थिएटर्स) बनवली गेली.
रशियात कामगार वर्गाच्या सत्तेच्या स्थापनेनंतर अमेरिका, ब्रिटन सहीत 14 देशांच्या सेनेने रशियन प्रतिक्रांतिकाऱ्यांसोबत मिळून क्रांतीला चिरडण्यासाठी हल्ला चढवला. परंतु समाजवादी रशियाच्या कामगार वर्गाने या हल्ल्याला सडेतोड उत्तर देत क्रांतीचे रक्षण केले. याच कामगार वर्गाच्या लाल सेनेने 2 कोटी कामगारांचे बलिदान देऊन दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरच्या फॅसिस्ट नाझी सेनेचा पराभव केला आणि जगाला विनाशापासून वाचवले.
ऑक्टोबर क्रांतीने फक्त सोवियत रशियाचेच राजकीय चित्र बदलले नाही, तर स्वनिर्णयाच्या तत्त्वाचे समर्थन करत भारत, चीन, आफ्रिकेतील देशांसहीत जगभरातील साम्राज्यवाद-विरोधी, वसाहतवाद-विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यांना सुद्धा प्रेरणा दिली, समर्थन दिले आणि जगातून साम्राज्यवादाचा नायनाट करण्यात मोठी भुमिका निभावली.
समाजवादी संक्रमणाच्या काळातील वर्गसंघर्षाच्या सैध्दांतिक समजदारीतील कमतरतांमुळे स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली रशियाने समाजवाद तर टिकवला, परंतु त्यानंतर ख्रुश्चेवच्या काळापासून सुरू झालेली भांडवली पुनर्स्थापना रोखली जाऊ शकली नाही. माओंच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये महान सर्वहारा सांस्कृतिक क्रांतीच्या प्रयोगाने अशा भांडवली पुनर्स्थापना होऊ न देण्याच्या सिध्दांताची पायाभरणी केली, परंतु चीनमध्येही भांडवली पुनर्स्थापना झाली. प्रतिक्रियेच्या आजच्या काळात, ऑक्टोबर क्रांतीचे योग्य वैज्ञानिक विश्लेषण करून योग्य धडे घेत पुढे जाणे हे आपले कर्तव्य आहे. चीन व रशियातील प्रयोगांमधून मिळालेल्या वैज्ञानिक शिकवणींना व्यवहारात योग्यरित्या लागू करून समाजवादी संक्रमणाच्या कालखंडाची यात्रा पूर्ण करणे हे आह्वान भावी क्रांत्या करणाऱ्या कामगार वर्गासमोर आहे.
ऑक्टोबर क्रांतीने जगाला बदलवून टाकले, आणि चीन व रशियातील समाजवादाच्या दोन महान प्रयोगांच्या विपर्ययानंतरही ऑक्टोबर क्रांतीपासून प्रेरणा घेऊन तिचा वारसा पुढे नेणाऱ्या क्रांतिकारी शक्ती कामगार वर्ग सतत जन्माला घालतच आहे. ऑक्टोबर क्रांतीने शोषणमुक्त समाजाची जी रणदुदुंभी वाजवली आहे, तिचा नाद अनंत काळापर्यंत इतिहासाच्या अवकाशात भरून राहील.
आज जगभरात आर्थिक संकट तीव्र होत आहे. भांडवलशाहीने बहुसंख्यांक कामगार-कष्टकरी वर्गाकरिता नरका-समान जीवनस्थिती बनवल्या आहेत. आज 2022 मध्ये पुन्हा एकदा जागतिक महामंदीची सुरूवात होऊ घातली आहे, आणि प्रचंड बेरोजगारी, गरिबी, अभाव, युद्ध अशी संकटे आ वासून समोर उभी आहेत. अशावेळी ऑक्टोबर क्रांती आजही कामगार वर्गाला ती प्रेरणा देत आहे की भांडवलशाहीच्या पुढील जग शक्य आहे! ऑक्टोबर क्रांतीचा वारसा स्विकारणारा कामगार वर्ग हार स्विकारणार नाही, तर तो उभा राहील आणि भांडवलशाही-साम्राज्यवादाच्या दैत्याला, आणि त्याने उभ्या केलेल्या फॅसिझमच्या, उजव्या प्रतिक्रियेच्या भस्मासूराला नष्ट करून समाजवादाची नवनिर्मिती केल्याशिवाय तो थांबणार नाही!
महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा जिंदाबाद!
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022