ऑक्टोबर क्रांतीचा वारसा आणि एकविसाव्या शतकातील नव्या समाजवादी क्रांत्यांचे आव्हान
आज ऑक्टोबर क्रांतीच्या महान वारशाचे स्मरण करण्याची गरज आहे. कारण कामगार वर्गाचा मोठा हिस्सा हा हताश आणि निराश झालेला आहे. त्याच्या पूर्वजांनी कामगारांचे राज्य स्थापन केले होते आणि असे काही असामान्य प्रयोग केले होते ज्यांच्याबद्दल आज वाचतानासुद्धा चकित व्हायला होतं, हे त्याला माहीत नाही. शेवटी त्या प्रयोगांचे अपयश आणि त्यामागची कारणेसुद्धा समजून घेतली पाहिजेत. परंतु या महान क्रांतीपासून प्रेरणा आणि बळ घेताना, तिच्याकडून सकारात्मक आणि नकारात्मक धडा घेताना हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की या क्रांतीचा वारसा जणू आपल्याला सांगतो आहे, माझ्याकडून शिका. माझ्या उपलब्ध्या आणि माझ्या चुका, दोन्हींकडून शिका. परंतु माझी नक्कल करू नका. माझे अंधानुकरण करू नका. आपल्या देशकाळाचे वैशिष्ट्य ओळखा आणि माझ्या नव्या आवृत्तीच्या रचनेची तयारी करा.