स्मृतिदिन (10 मार्च) विशेष : सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी वारसा
✍️ स्वप्नजा
भारताच्या समाजसुधारणेच्या इतिहासात जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान क्रांतिकारी आणि प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या काळात शिक्षणावर ब्राह्मणवादी शक्तींची मक्तेदारी असताना, 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात त्यांनी आणि जोतीराव फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. स्त्रिया आणि दलितांना शिक्षण मिळावे, जातीभेद नष्ट व्हावेत, केशवपनासारख्या अमानवी रूढी बंद पडाव्यात, समाजाद्वारे “बहिष्कृतां”साठी मूलभूत सोयी उपलब्ध व्हाव्यात, अशा अनेक गोष्टींसाठी फुले दांपत्याने अथक संघर्ष केला. सामाजिक परिवर्तनाचा संघर्ष करत असतानाच जोतीरावांनी ब्रिटीश सत्तेचे भांडवली चरित्र सुद्धा ओळखले आणि जाती प्रश्नावरील संघर्षाला सत्तेविरोधातील संघर्षाशीही जोडले. त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून, संपूर्ण सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यापर्यंत पसरलेले आहे.
सावित्रीबाई फुले: सामाजिक बंडखोरीचे प्रतीक
सावित्रीबाईंचे घराबाहेर पडणे, स्वतः शिकून मग शिक्षिका होणे ही कृती स्वतःहूनच क्रांतिकारक होती. 19व्या शतकात महिला घराच्या चौकटीत, चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त होत्या. या काळात जेव्हा महिलांना आणि दलितांना शिक्षणावर बंदी होती अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणाचा प्रसार करून महिलांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वंचितांच्या शिक्षणासाठी अधिकाधिक प्रयत्न केले. मनुस्मृतीच्या घोषित शिक्षण बंदीच्या विरुद्ध हा प्रखर विद्रोह होता. सावित्रीबाईंवर शाळेत येता-जाता उच्चवर्णीयांकडून दगड धोंड्यांचा वर्षाव झाला. त्या शाळेत जात असताना लोक दगडफेक करत, चिखल किंवा शेण फेकत, ज्यामुळे सावित्रीबाई आपल्या झोळीत नेहमी दोन साड्या घेऊन जात; एक रस्त्यात खराब झाली, तर दुसरी शाळेत वापरण्यासाठी होती, जेणेकरून आपल्या कामात कुठलीही अडचण येऊ नये. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना जातीय भेदभाव आणि सामाजिक अत्याचारांमुळे पुण्यातील घर सोडावे लागले, तेव्हा फातिमा शेख आणि त्यांच्या भाऊ उस्मान शेख यांनी आपल्या घरात आसरा दिला. फातिमा शेख यांच्याच घरातून 1848 मध्ये सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
ब्राह्मण विधवांच्या सक्षमीकरणाचा लढा
सावित्रीबाईंनी “फसविल्या” गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या मदतीसाठी 1863 साली स्वतःच्या घरी “बालहत्या प्रतिबंधक गृह” सुरू केले. त्या काळात विधवांना समाजाने पिळवटून टाकले होते. ब्राह्मण विधवांवर एकेकाळी सामाजिक रुढींचा भाग म्हणून त्यांचे केस कापण्याची सक्ती केली जात असे. या अन्याय्य प्रथेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नाभिकांना फुले दापत्याने जागृत केले आणि त्यांनी केशवपनाच्या प्रथेमध्ये सहभागी होण्यास नकार देत संप केला. 23 मार्च 1890 या संपाच्या दरम्यान 500 न्हावी उपस्थित होते.
जाती निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पावले
सावित्रीबाई फुले यांनी जातीपातीने विभागलेल्या आणि सामाजिक विषमतेने भरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी अनेक उल्लेखनीय कार्ये केली. त्याकाळी अस्पृश्यांना पाणी, शिक्षण आणि मंदिर प्रवेशासह मूलभूत हक्कही नाकारले जात होते. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून जातीव्यवस्थेच्या रूढींना मोठा धक्का दिला. ही कृती सामाजिक बंधनांच्या विरोधातील क्रांतिकारक पाऊल होते. हौद खुला करणे म्हणजे अस्पृश्यतेचा स्पष्ट निषेध करणे आणि सर्वांना समान हक्क मिळावेत यासाठीचा प्रतीकात्मक संदेश होता. सावित्रीबाई आणि जोतीराव यांनी फक्त महिलांसाठीच नव्हे, तर दलित मुला-मुलींसाठीही शाळा सुरू केल्या, जिथे मुलांना जातिभेदाच्या भिंतींपलीकडे शिक्षणाचा प्रकाश मिळाला. त्या काळात अशा मुलांना शिक्षण देणे म्हणजे समाजातील ‘उच्च’वर्णीयांचा रोष ओढवून घेणे होते.
शिक्षण आणि समाज सुधारणा: एक व्यापक दृष्टीकोन
1818 मध्ये पेशवाई संपुष्टात आली आणि महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीचा अंमल सुरू झाला. ब्रिटिश राजवटीत शिक्षणाची मक्तेदारी ‘उच्च’वर्णीय ब्राह्मणांकडे होती. इतर जातींना व महिलांना शिक्षण मिळणे हे धोकादायक मानले जात होते. जोतिबा सोबत सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी या व्यवस्थेला आव्हान दिले. इंग्रजांनी भारतामध्ये ज्या औपचारिक शिक्षणाची सुरुवात केली त्याचा उद्देश “शरीराने भारतीय पण मनानं इंग्रज” क्लर्क जन्माला घालणं होता. फुले दांपत्याने शिक्षण हे केवळ साक्षरतेच्या औपचारिकतेकरिता चालवले नाही तर त्यामध्ये तार्किकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याला महत्व दिले.
ज्या काळात सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले आणि फातिमा शेख यांनी हे क्रांतिकारी कार्य सुरु केलं, तेव्हा सर्वच कष्टकरी शिक्षणापासून वंचित होते आणि दलित तर त्याहूनही जास्त वंचित. आजही स्थिती फारशी वेगळी नाही. 1991 पासून खाजगीकरण उदारीकरणाची धोरणे राबवल्यानंतर इतर सगळ्या क्षेत्रांसारखंच शिक्षणाचे सुद्धा पूर्णतः बाजारीकरण झालेलं आहे. आज खासगीकरणामुळे उच्च शिक्षणाचे दरवाजे फक्त ज्यांच्या खिशात पैसा आहे त्यांच्यासाठीच खुले आहेत. कुठलाही कोर्स किंवा डिग्री घेण्यासाठी हजारो लाखो रुपयांची फी मोजावी लागते. काही इंजिनियरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी करोडो रुपयांचे डोनेशन मोजावे लागते आणि गेल्या दहा वर्षांमध्ये या गोष्टीत अधिकच भर पडली आहे. अनेक सरकारी शाळांना कुलूप लावले गेले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे: फॅसिस्ट मोदी सरकार आणि भांडवली व्यवस्था स्पष्टपणे हेच म्हणत आहेत की कामगार-कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या मुलामुलींनी शिकूच नये. या अघोषित शिक्षण बंदीचा विरोध आपण सर्वांनीच ठामपणे केला पाहिजे. आजच्या काळात शिक्षण व्यवस्थेवर वाढत्या फॅसिस्ट हल्ल्यांचा सामना करताना सावित्रीबाई, जोतिबा फुले, फातिमा शेख आणि इतर क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसा जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, जोतिबा फुले यांच्या क्रांतिकारी वारशाची आठवण काढत आपल्याला हा विचार करावा लागेल की त्यांनी सुरू केलेल्या संघर्षाचं आज काय झालंय? या नवीन अघोषित शिक्षण बंदीचा विरोध करत कामगार-कष्टकऱ्यांना, मेहनत करणाऱ्यांना, “सर्वांना समान मोफत दर्जेदार शिक्षण” आणि “सर्वांना पक्का रोजगार” या मागणीला घेऊन एकजूट व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्तीच्या दिशेने पाऊल उचलावे लागेल, स्त्रियांना चूल आणि मूल या चौकटीत अडकवणाऱ्या या पितृसत्तेच्या विरोधात आणि सोबतच तिला टिकवणाऱ्या भांडवली व्यवस्थेविरोधात सक्रिय आंदोलन उभं करावं लागेल. जातीवादाविरोधात आणि जातीअंतासाठी पाऊल उचलावे लागेल अगदी शेण गोळे, दगड धोंडेच सहन करावे लागले, तरीही. जोतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सुद्धा सावित्रीबाई फुले सतत जनकार्यामध्ये सक्रीय होत्या. 1897 मध्ये प्लेगग्रस्तांना मदत करताना सावित्रीबाईंचे निधन झाले. त्यांनी आपल्या जीवनाची 50 वर्षे जनतेच्या सेवेत समर्पित केली. सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सावित्रा-जोतिबांना साथ देणाऱ्या फातिमा शेख यांचेही योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि तो पुढे नेणे, त्यांच्या स्वप्नांना साकार करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कामगार बिगुल, मार्च 2025