स्मृतिदिन (10 मार्च) विशेष : सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी वारसा
सावित्रीबाईंचे घराबाहेर पडणे, स्वतः शिकून मग शिक्षिका होणे ही कृती स्वतःहूनच क्रांतिकारक होती. 19व्या शतकात महिला घराच्या चौकटीत, चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त होत्या. या काळात जेव्हा महिलांना आणि दलितांना शिक्षणावर बंदी होती अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणाचा प्रसार करून महिलांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वंचितांच्या शिक्षणासाठी अधिकाधिक प्रयत्न केले. मनुस्मृतीच्या घोषित शिक्षण बंदीच्या विरुद्ध हा प्रखर विद्रोह होता.