Category Archives: जाति प्रश्न

नवीन वर्षाचा पहिला दिवसच जातीय तणावात! जात-धर्माच्या नावाने न झगडता खरे मुद्दे उचलायला हवेत!

आज सर्व जातींमधील गरिबांना हे समजवून सांगण्याची गरज आहे की त्यांच्या हलाखीच्या अवस्थेला खरेतर दलित, मुस्लिम किंवा आदिवासी जबाबदार नाहीत तर त्यांच्या स्वत:च्या आणि इतर जातींमधील श्रीमंत लोक आहेत. जोपर्यंत कष्टकरी जनतेला हे समजणार नाही तोपर्यंत हेच होत राहील की एक जात आपले एखादे आंदोलन उभे करेल आणि त्याच्या विरोधात शासक वर्ग इतर जातींचे आंदोलन उभे करून जातीय विभाजन अजून वाढवेल. या षडयंत्राला समजणे गरजेचे आहे. या षडयंत्राचे उत्तर अस्मितावादी राजकारण आणि जातीय गोलबंदी नाही. याचे उत्तर वर्ग संघर्ष आणि वर्गीय गोलबंदी हेच आहे. या षडयंत्राचा बुरखा फाडावा लागेल आणि सर्व जातींमधील बेरोजगार, गरीब आणि कष्टकरी लोकांना संघटीत आणि एकत्रित करावे लागेल.

भीमा कोरेगाव लढाईच्या २०० वर्ष साजरीकरणाचा सोहळा – जाती-अंताची योजना अशा अस्मितावादामूळे पुढे नाही, उलट मागे जाईल!

भारतातील जनतेला कायम विभाजित ठेवण्यासाठी इंग्रजांनी जाती व्यवस्थेचा आणि धर्माचा वापर केला होता. इंग्रजांनी जाती व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी अगदी जाणीवपूर्वक अजिबात काही खास केले नाही. अशा स्थितीत जर कोणी स्वत:ला जातीअंताचे आंदोलन म्हणत असेल (रिपब्लिकन पॅंथर) आणि कोरेगावच्या लढाईचे २०० वे वर्षे साजरे करत असेल तर स्वाभाविकच ते असेही म्हणत असतील कि इंग्रजांचे सैनिक हे जाती अंताचे शिपाई होते. वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. अशा संघटना ना जाती अंताची कुठली सांगोपांग योजना देवू शकतात, ना त्यावर दृढपणे अंमलही करू शकतात.

शासक वर्गाद्वारे कष्टकऱ्यांच्या जातीय मोर्चेबांधणीचा विरोध करा

महाराष्ट्रात आज जो मराठ्यांचा उभार होत आहे, त्याचे मूळ कारण मराठा गरीब जनतेमधील बेरोजगारी, महागाई, गरिबी आणि असुरक्षा हेच आहे, परंतु मराठा शासक वर्गाने त्याला दलित विरोधी वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. हे कारस्थान ओळखले पाहिजे. अस्मितावादी राजकारण अथवा जातिगत मोर्चेबांधणी हे या कारस्थानावरचे उत्तर नाही. याचे उत्तर वर्ग संघर्ष आणि वर्गीय मोर्चेबांधणी हेच आहे. हे कारस्थान उघडे पाडले पाहिजे आणि सर्व जातींच्या बेरोजगार, गरीब आणि कष्टकरी जनतेला एकजूट आणि संघटित केले पाहिजे. याच प्रक्रियेत ब्राम्हण्यवाद आणि जातियवादावरसुद्धा प्रहार केला जाऊ शकतो.

जातिउन्मूलनाची ऐतिहासिक परियोजना पुढे नेण्यासाठी अनिवार्य उत्तरे

कोणत्याही दमित ओळखीच्या किंवा समुदायाच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे की त्या समुदायाचे सर्वच सदस्य कधीच त्या दमनाच्या विरोधात लढत नाहीत. त्यांची व्यापक बहुसंख्या म्हणजेच गरीब कष्टकरी जनताच दमन आणि उत्पीडनाच्या विरोधात लढते. काऱण दमन आणि वर्चस्व अधिक बळकट बनवण्यासाठी शासक वर्ग नेहमीच सर्वांत दमित समुदायांच्या एका हिश्शाला सहयोजित करीत असतो. मार्क्स यांनी भांडवलच्या तिसऱ्या खंडात म्हटल्याप्रमाणे, शासक वर्ग शासित वर्गातील तीव्रतम मेंदूंना आपल्यात सामील करून घेण्यात ज्या मर्यादेपर्यंत यशस्वी होतो, तेवढेच त्याचे शासन जास्त स्थिर आणि खतरनाक बनते. अगदी याच प्रकारे दमित राष्ट्रीयता, स्त्रिया आणि आदिवाश्यांमधून शासक वर्गाने एका हिश्शाला सहयोजित केले आहे, त्याला कुलीन बनवले आहे आणि त्याला सत्ता आणि संसाधनांमध्ये एक वाटासुद्धा दिलेला आहे. अस्मितावादी राजकारण कधीच सबवर्सिव होऊ शकत नाही, त्याचे हेदेखील आणखी एक कारण आहे. म्हणूनच प्रत्येक दमित समुदायामध्ये त्या विशिष्ट दमनाच्या रूपाचा सामना एका वर्गाधारित चळवळीद्वारेच केला जाऊ शकतो. त्याच प्रकारे, जातिउन्मूलनाची परियोजना वर्ग संघर्षाचे एक अविभाज्य अंग आहे. ही त्याच्यापासून वेगळी किंवा पूर्णपणे स्वायत्त नाही, ना ती त्याच्याशी संकलित (एग्रीगेटिव्ह) पद्धतीने जोडलेली आहे. वास्तविक, हे तिचे एक जैविक अंग आहे. या रूपात आम्ही असे म्हणतो की झुंजार जातिविरोधी सामाजिक सांस्कृतिक चळवळीशिवाय क्रांती शक्य नाही आणि क्रांतीशिवाय जातीचे निर्णायक उन्मूलन शक्य नाही. क्रांती होताच आपोआप जातीचे उन्मूलन होईल, असा याचा अर्थ नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु एवढे मात्र निश्चित आहे की जातिव्यवस्थेला खतपाणी देणाऱ्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेला क्रांतीबरोबर इतिहासाच्या कचराकुंडीत पोहोचविता येईल.

चौकशी यंत्रणा, पोलिस, न्याय व्यवस्थेकडून दलितांना न्याय मिळू शकत नाही!

नेता मंत्री, नोकरशाही आणि न्यायालयाने वारंवार या गोष्टीचे पुरावे दिलेले आहेत की येथे दलितांना न्याय मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. न्यायव्यवस्थेची ही भूमिका फक्त दलितांपुरतीच मर्यादित नाही तर धार्मिक अल्पसंख्याकांबाबतही हेच खरे आहे. सुनपेडच्या घटनेच्या फोरेंसिक चाचणीत आता असे सांगितले जाते आहे की दलित कुटुंबाच्या घरात आग बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने लावली नाही तर घरातूनच—म्हणजे मृत मुलांच्या बापानेच ती लावली होती. अशा प्रकारे या एकूण घटनेला जातिय अत्याचाराच्या रूपात नाही तर कौटुंबिक कलहाचा परिणाम असल्याचे सिद्ध करण्याचे प्रयत्न होत आहेत. या चौकशांमध्ये कितपत खरेपणा असतो हे आपण इतिहासात पाहिलेले आहेच.