नकली देशभक्तीच्या कोलाहालात सामान्य कष्टकरी जनतेच्या जगण्याचे जिव्हाळ्याचे मुद्दे झाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे. डाळ, भाजी, औषधे, तेल, गॅस, घर भाडे, अशा प्रत्येक गोष्टीत आकाशाला भिडणाऱ्या महागाईने गरीब तथा निम्न मध्यम वर्गाचे पार कंबरडे मोडले आहे. विकासाच्या लंब्या-चवड्या दाव्यांच्या पूर्तीची गोष्ट तर दूरच, उलट गेल्या चार वर्षात खाण्या-पिण्याच्या, औषध-पाण्याच्या, शिक्षणासारख्या मुलभूत गोष्टी मात्र बक्कळ महाग झाल्यात. दुसरीकडे मनरेगा व विभिन्न कल्याणकारी योजनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली गेली आहे, तर अंबानी, अदानी, बिर्ला, टाटा सारख्या मालकांना मोदी सरकार तोहफ्यावर तोहफे देत आहे. अनेक करांवर सवलत, मोफत वीज, पाणी, जमीन, विना व्याज कर्ज आणि कामगारांना मनसोक्त लुटण्याची मुभा दिली जात आहे. देशाची नैसर्गिक साधन-संपत्ती आणि जनतेच्या पैश्यातून उभारलेले उद्योग, कवडी मोल किंमतीत त्यांच्या हवाली केले जात आहेत.